नागपुरात लुटमार करणारी सशस्त्र टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:15 AM2018-02-05T10:15:42+5:302018-02-05T10:17:42+5:30
गणराज्य दिनाचे शहरात सर्वत्र कार्यक्रम सुरू असताना एकाच रात्रीत पाच जणांना चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून लुटलेले १ लाख ५५ हजारांचे साहित्य आणि शस्त्र जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणराज्य दिनाचे शहरात सर्वत्र कार्यक्रम सुरू असताना एकाच रात्रीत पाच जणांना चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून लुटलेले १ लाख ५५ हजारांचे साहित्य आणि शस्त्र जप्त केले.
अनुज संजय दहासहस्र (वय २१. रा. राजविलास टॉकीजवळ, महाल) हे २६ जानेवारीला रात्री कामावरून घरी परत जात होते. आरोपी रोहित अशोक पाटील (वय २३), रजत दिलीप ननेट (वय २१), कार्तिक राम ननेट (वय २२, सर्व रा. मेकोसाबाग, जरीपटका), कुणाल कुंदन डोंगरे (वय १९, रा. इंदोरा, साधू मोहल्ला, जरीपटका) यांनी अनूजला ताजबागला कोणत्या मार्गाने जायचे, अशी विचारणा करून थांबविले. चाकूच्या धाकावर त्याला मारहाण केली. त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या मांडीवर चाकू मारला. त्यानंतर त्याचा अॅपलचा मोबाईल व खिशातील १२० रुपये हिसकावून आरोपी पळून गेले. कोतवालीतील या गुन्ह्यासारखेच दोन गुन्हे त्यांनी जरीपटका ठाण्याच्या हद्दीत आणि सदर तसेच गिट्टीखदानमध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच लुटमारीचे गुन्हे केले. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा तपास करताना उपरोक्त आरोपीच्या टोळीला शनिवारी अटक केली. त्यांची ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवून त्यांच्याकडून लुटलेले दोन मोबाईल, एक पल्सर मोटरसायकल, दोन अॅक्टीव्हा आणि चाकू तसेच ५०० रुपये असा एकूण १ लाख, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या निर्देशानुसार, गुन्हे शाखेचे (प्रगटीकरण) संभाजी कदम, सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक निरीक्षक कमलाकर गड्डीमे, प्रभाकर शिवूरकर, ज्ञानेश्वर भेदोडकर, पोलीस उपनिरीक्षक मंगला मोकाशे, हवलदार राजेश ठाकूर, शैलेष पाटील, रफिक खान, नायक अरुण धर्मे, दयाशंकर बिसांद्रे, राकेश यादव, अतुल दवंडे, राजू पोतदार आणि सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली.