लुटारूंची टाेळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:36+5:302021-03-28T04:08:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर वाहनचालकांना अडवून त्यांना मारहाण करीत लुटणाऱ्या आंतरजिल्हा टाेळीतील चाैघांना स्थानिक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर वाहनचालकांना अडवून त्यांना मारहाण करीत लुटणाऱ्या आंतरजिल्हा टाेळीतील चाैघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चाैघांनी तीन दिवसांपूर्वी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील रुईखैरी शिवारात तसेच हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकळी (घारपुरे) शिवारात वाहनचालकांना लुटले हाेते.
मयूर कृष्णा राऊत (२८), कुलदीपसिंग लखनसिंग बावरी (२२), राेहित जाॅर्ज डेव्हीड (२१, तिघेही रा. रुईखैरी, ता. नागपूर ग्रामीण) व राहुल श्रीराम डेहरिया (२२, रा. सुकळी-घारपुरे, ता. हिंगणा) अशी अटक करण्यात आलेल्या लुटारूंची नावे आहेत. रुईखैरी शिवारात चाैघांनी मंगळवारी (दि. २३) मुकेश कुवर (रा. नागपूर) याच्या पाेटावर चाकूने वार करीत जखमी केले आणि त्याच्याकडील साेनसाखळी व इतर साहित्य हिसकावून घेतले हाेते. त्यापूर्वी त्यांनी साेमवारी सुकळी (घारपुरे) शिवारात अनिल हत्तीमारे (रा. नागपूर) यांना मारहाण करीत त्यांच्याकडील कार व साहित्य हिसकावून पळ काढला हाेता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घटनांचा समांतर तपासाला सुरुवात केली. या घटनांमध्ये मयूर सहभागी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच या पथकाने त्याला शुक्रवारी (दि. २६) रुईखैरी येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावेही सांगितली. त्यामुळे याच पथकाने त्याच्या तिन्ही साथीदारांसह त्याला अटक केली. त्यांच्याकडून एमएच-४०/एएच-७७८८ व एमएच-३२/एजी-७४३३ क्रमांकाच्या दाेन माेटरसायकली व चार माेबाईल हँडसेट असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याआधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाठाेडा गावाजवळून एमएच-४९/यू-५४९९ क्रमांकाची कार जप्त केली हाेती.
आराेपींनी ही कार चाेरून आणली हाेती. त्या कारचा वापरही लुटमारीसाठी केला हाेता. पाेलिसांनी पाठलाग करताच त्यांनी ती कार वाठाेडा गावाजवळ साेडून दिली व जंगलाच्या दिशेने पळ काढला हाेता, असेही अनिल जिट्टावार यांनी सांगितले. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक सचिन मत्ते, नरेंद्र वैरागडे व जावेद शेख, गजेंद्र चाैधरी, महेया जाधव, मदन आसतकर, नाना राऊत, रामा आडे, शैलेश यादव, अमृत किनगे, राेहन डाखाेरे, बालाजी साखरे, अमाेल वाघ, विपीन गायधने, अजिज शेख, प्रणय बनाफर, साहेबराव बहाळे, भाऊराव खंडाते, अमाेल कुथे, सायबर सेलचे सतीश राठाेड यांच्या पथकाने केली.
...
चाैघेही सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेले चाैघेही सराईत गुन्हेगार असून, मुख्य आराेपी मयूर राऊत याच्याविराेधात मालमत्तेबाबत नागपूर ग्रामीणमध्ये ३० गंभीर गुन्ह्यांची नाेंद आहे. या चाैघांविरुद्ध नागपूर ग्रामीणमधील बुटीबाेरी, एमआयडीसी बुटीबाेरी, नागपूर शहरातील हिंगणा तसेच वर्धा जिल्ह्यातील सेलू पाेलीस ठाण्यात भादंविचे ३९७, ३४, सहकलम ४, २५, ३९२, ३७९ अन्वये गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.