धावत्या रेल्वेत पिस्तुलाच्या धाकावर लुटमार; पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नराच्या वेषातील आरोपींचा हैदोस
By नरेश डोंगरे | Published: January 4, 2024 04:30 PM2024-01-04T16:30:52+5:302024-01-04T16:31:44+5:30
किन्नराच्या वेषातील आरोपींनी जनरल कोचमध्ये प्रवाशांना पिस्तुलाच्या धाकावर मारहाण करत लुटले.
नरेश डोंगरे, नागपूर : किन्नराच्या वेषातील आरोपींनी जनरल कोचमध्ये प्रवाशांना पिस्तुलाच्या धाकावर मारहाण करत लुटले. बुधवारी मध्यरात्री पुणे हटिया एक्सप्रेसच्या मागच्या बाजुच्या जनरल कोचमध्ये ही घटना घडल्याचे सांगितले जाते. मात्र, आज दुपारी ३ वाजेपर्यंत या प्रकरणात पोलिसांना तक्रार मिळाली नसल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता.
नागपूरकडे येणारी पुणे-हटिया ही रेल्वेगाडी बुधवारी मध्यरात्री बुटीबोरीजवळ आली असताना किन्नरांच्या वेषातील पाच ते सात जणांनी प्रवाशांकडे पैशांची मागणी सुुरू केली. जे प्रवासी १०, २० रुपयांची नोट पुढे करायचे, त्यांना मारहाण करून आरोपी किन्नर पाचशे रुपयांची मागणी करीत होते. यातील एकाकडे पिस्तुल होते, तो किन्नर पिस्तुलाचा धाक दाखवत होता. शिवीगाळ करीत होते. साधारणत: बुटीबोरी - खापरी स्थानकापासून सुरू झालेला किन्नरांचा हा हैदोस नागपुरातील अजनी रेल्वे स्थानक येईपर्यंत सुरू होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अजनी स्थानकावर गाडी थांबताच आरोपी किन्नर पटापट उड्या घेऊन पळून गेले. त्यानंतर प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
धावत्या रेल्वेत पिस्तुलाच्या धाकावर लुटमार झाल्याचे कळताच आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. त्यांनी लगेच आरोपींना हुडकण्यासाठी चाैकशी सुरू केली. मात्र, गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. तक्रारदाराकडून अद्याप तक्रार मिळाली नसल्याचे पोलीस सांगत होते. दरम्यान, या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने अनेकांना फोन करून माहिती कळविल्याने ही घटना पुढे आली.