शालिमार एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न; 'त्यांनी' डब्यात प्रवेश केला अन्..
By नरेश डोंगरे | Published: July 26, 2022 12:40 PM2022-07-26T12:40:27+5:302022-07-26T12:47:16+5:30
हातबुक्क्यांनी मारहाण, प्रतिकार पाहून लुटारू पळाले
नरेश डोंगरे
नागपूर : ट्रेनची गती कमी झाल्याची संधी साधून लुटारूंच्या एका टोळक्याने डब्यात प्रवेश केला आणि पश्चिम बंगालमधील प्रवाशांना मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी जोरदार प्रतिकार करून आरडाओरड केल्याने लुटारू घाबरले आणि रेल्वे डब्यातून उडी घेऊन पळून गेले. सोमवारी दुपारी नागपुरात शालिमार एक्स्प्रेसमध्ये ही थरारक घटना घडली. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ निर्माण झाली. दरम्यान, लुटारूंचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांसह तपास यंत्रणा रात्री उशिरापर्यंत धावपळ करीत होत्या.
कुर्ला-हावडा शालिमार एक्स्प्रेसने सोमवारी दुपारी नियोजित वेळेनुसार नागपूर स्थानकावरून प्रस्थान केले. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास शांतीनगर-इतवारी भागात या ट्रेनची गती काहीशी कमी झाली. त्याचा फायदा उचलून लुटारूंचे एक टोळके रेल्वेच्या एका डब्यात शिरले. त्यांच्या हातात दांडुके आणि लोखंडी सळी होती. ज्या डब्यात दरोडेखोर शिरले त्या डब्यात पश्चिम बंगालमधील प्रवासी मोठ्या
संख्येत बसून होते. त्यांना मारहाण करून धाक दाखवत त्यांनी लुटालूट करण्याचा प्रयत्न केला. अनेकांचे बॅग, सामानही हुडकण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे प्रवाशांपैकी काहींनी हिंमत दाखवून लुटारूंचा जोरदार प्रतिकार केला. आरडाओरडही केली. त्यामुळे लुटारू घाबरले आणि त्यांनी रेल्वेगाडीतून उडी घेऊन पोबारा केला. जाता जाता हाती लागेल ते किरकोळ सामानही त्यांनी पळविले. दरम्यान, प्रवाशांनी ही माहिती गार्डला दिली. त्यानंतर आरपीएफ, जीआरपीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासन तसेच सुरक्षा यंत्रणांना ही माहिती देण्यात आली. धावत्या रेल्वेत लुटारूंनी प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त वायुवेगाने पसरल्याने एकच खळबळ उडाली. ज्या ठिकाणी (भागात) ही घटना घडली, त्या शांतीनगर, इतवारी भागात रेल्वे पोलीस, जीआरपीची स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींना शोधण्यासाठी धावपळ करू लागली.
आरोपींची संख्या स्पष्ट नाही
वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आरोपींची संख्या पाच ते सहा होती. मात्र, पोलिसांकडून लुटारूंचा नेमका आकडा स्पष्ट करण्यात आला नाही. कुणी दोन, कुणी चार तर कुणी सहा सांगत होते. रात्रीपर्यंत कोणताही लुटारू पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, लुटारूंनी वापरलेले दोन काठी वजा दांडके पोलिसांनी जप्त केले. काही वर्षांपूर्वी असाच प्रकार याच भागात झाला होता, हे विशेष ।
तक्रार देण्यास आढेवेढे, पोलिसांकडून समुपदेशन
विशेष म्हणजे, धावत्या रेल्वेत लुटारूंकडून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला असला तरी संबंधित प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे रीतसर तक्रार देण्यासाठी बरेच आढेवेढे घेतले. आमचे फारसे काही नुकसान झाले नाही, अशी भाषा करून ते तक्रार देण्याचे टाळू लागले. आम्हाला गावाला पोहोचण्यास उशीर होईल, अशी सबबही त्यांनी मांडली. आम्ही आमच्या गावाला पोहोचल्यावर तिकडेच तक्रार देऊ, असेही ते म्हणाले. ही माहिती कळाल्याने जीआरपीचे एक पथक धावत्या रेल्वेत आमगाव, भंडाऱ्यापर्यंत या प्रवाशांनी तक्रार द्यावी म्हणून त्यांचे समुपदेशन करत होती.
आरोपींना लवकरच पकडू -पोलीस अधीक्षक
लुटारूंची वेशभूषा आणि एकूणच प्रकार पाहता ते शांतीनगर, इतवारी याच भागातील असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. ते नशेडी (गंजड्डी किंवा गर्दुले) असावेत, असाही संशय आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास जीआरपीचे अधीक्षक एम. राजकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.