सराफाची रेकी करून घातला दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:12+5:302021-07-07T04:09:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अवनी ज्वेलर्समध्ये दोन दिवसांपूर्वी एका दरोेडेखोराने दागिना खरेदी केला. त्या बहाण्याने दुकानाची आणि परिसराची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवनी ज्वेलर्समध्ये दोन दिवसांपूर्वी एका दरोेडेखोराने दागिना खरेदी केला. त्या बहाण्याने दुकानाची आणि परिसराची रेकी केली आणि सोमवारी भरदुपारी दरोडा घातला. दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि सराफा व्यावसायिक नावरे यांच्या प्राथमिक चाैकशीतून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानीत राजकीय वातावरण तापले असताना उपराजधानीत दरोडेखोरांनी पोलिसांची झोप उडवून दिली. भरदुपारी दोन माजी गृहमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या उपराजधानीत भरदुपारी पिस्तुलाच्या धाकावर सराफा दुकानात पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याची माहिती मुंबईतील शीर्षस्थांकडून विचारली जात आहे. त्यामुळे पोलीस दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सराफा दुकानाचे गेल्या आठवडाभराचे फुटेज तसेच सराफा दुकानदाराचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्यानुसार, चारपैकी एक दरोडेखोर शनिवारी दुपारी एका महिलेसह नावरे यांच्या दुकानात आला. त्यावेळी त्याने आपले नाव पांडे सांगितले होते. त्याने आणि सोबतच्या महिलेने ८०० रुपयांची सोन्याची नथनी खरेदी केली. बदल्यात नावरे यांना जुनी एक नथ आणि ३०० रुपये दिले. त्यावेळी आरोपी ४५ मिनीट दुकानात होता. त्याने दुकानात किती रोकड आणि दागिने आहे, त्याची रेकी केली. त्यानंतर ४८ तासांत तयारी करून आज त्यांनी हा दरोडा घातला. आजही दुकानात शिरण्यापासून तो बाहेर पडण्यापर्यंत २० मिनिटे दरोडेखोर दुकानात होते.
---
टोल नाक्याच्या सीसीटीव्हीत दरोडेखोर कैद
ते मध्यप्रदेशात पळून गेले असावे, असा संशय आहे. मनसर देवलापार टोल नाक्याच्या सीसीटीव्हीत दरोडेखोर २.५६ वाजता कैद झाले.
दरोडेखोरांच्या या टोळीत महिलाही सहभागी असल्याचे उपरोक्त घटनाक्रमावरून स्पष्ट झाले आहे.
-----