विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:35+5:302021-07-14T04:09:35+5:30
नागपूर : कोरोनामुळे रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु या विशेष रेल्वेगाड्यात प्रवाशांकडून अधिक शुल्क वसूल ...
नागपूर : कोरोनामुळे रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु या विशेष रेल्वेगाड्यात प्रवाशांकडून अधिक शुल्क वसूल करण्यात येत आहे. यात एका प्रवाशाला साधारणपणे २०० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने नियमित रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुळे रेल्वेत २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन करण्यात आले. परंतु जागोजागी अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. नियमित रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे मे २०२० पासून विशेष रेल्वेगाड्यांचा पर्याय शोधण्यात आला. परंतु या विशेष रेल्वेगाड्यात विशेष शुल्क आकारण्यात येत आहे. नाईलाजास्तव प्रवाशांना हे शुल्क मोजावे लागत आहे. नियमित रेल्वेगाड्या सुरू असत्या तर प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली नसती. विशेष रेल्वेगाड्यांमुळे प्रत्येक प्रवाशाला १०० ते २०० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. परंतु फायदा होत असल्यामुळे रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्या चालवित असल्याचा आरोप प्रवासी संघटनांकडून होत आहे. प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी नियमित रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
.............
सध्या धावताहेत २२८ रेल्वेगाड्या
कोरोना सुरू होण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात जवळपास २७० रेल्वेगाड्या सुरू होत्या. परंतु कोरोनामुळे सहा महिने रेल्वेची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर जागोजागी अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्यासाठी १६ विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. हळूहळू या विशेष रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यात आली. सध्या नागपूर विभागात एकूण २२८ विशेष रेल्वेगाड्या धावत आहेत.
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
सध्या कोरोनामुळे विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या विशेष रेल्वेगाड्यात कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे कन्फर्म आरक्षण असण्याची सक्ती बंद करायला हवी. अनेकदा प्रवाशांना ऐनवेळी प्रवास करण्याची गरज भासते. त्यामुळे प्रवाशांना वेटींगच्या तिकीटावरच प्रवास करण्याची मुभा देण्याची गरज आहे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
कोरोनाची लाट ओसरली, नियमित रेल्वेगाड्या सुरू करा
‘रेल्वे प्रशासनाच्यावतीने कोरोनाच्या काळात विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु या गाड्यात अधिक प्रवासभाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. आता कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांची लूट थांबवावी.’
-विशाल सहस्त्रबुद्धे, रेल्वे प्रवासी
आर्थिक लूट थांबवावी
‘विशेष रेल्वेगाड्यांच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. प्रवाशांना १०० ते २०० रुपये अधिक प्रवासभाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने प्रवाशांची आर्थिक लूट थांबवून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.’
-प्रशांत किनखेडे, रेल्वे प्रवासी
प्रवाशांची लूट कशासाठी ?
‘कोरोनामुळे विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. परंतु आता परिस्थिती सर्वसामान्य झाली आहे. तरीसुद्धा रेल्वे प्रशासन प्रवाशांची लूट कशासाठी करीत आहे, हा प्रश्न आहे. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्या सुरू करणे आवश्यक आहे.’
-सतीश यादव, सदस्य, झोनल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती, मध्य रेल्वे
...........
नागपूरवरून विविध ठिकाणचे प्रवासभाडे
मुंबईनियमित रेल्वेगाड्या : एसी टु-१५६५, एसी थ्री-११२५, स्लिपर ४३०
विशेष रेल्वेगाड्या : एसी टु-१७१०, एसी थ्री-१२१०, स्लिपर ४६०
पुणेनियमित रेल्वेगाड्या : एसी टु-१५१०, एसी थ्री-११६५, स्लिपर ४२५
विशेष रेल्वेगाड्या : एसी टु-१७२५, एसी थ्री-१२०५, स्लिपर ४४५
हैदराबाद नियमित रेल्वेगाड्या : एसी टु-१२१०, एसी थ्री ७७०, स्लिपर-३५५
विशेष रेल्वेगाड्या : एसी टु-१३४०, एसी थ्री-९५५, स्लिपर-३६५
दिल्ली नियमित रेल्वेगाड्या : एसी टु-१७८०, एसी थ्री १२५५, स्लिपर-५१५
विशेष रेल्वेगाड्या : एसी टु-२०२०, एसी थ्री-१४२०, स्लिपर-५४०
..............