नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा, एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 11:11 PM2020-05-21T23:11:02+5:302020-05-21T23:20:15+5:30

हिंगणा एमआयडीसी परिसरातील आऊटर रिंग रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी पहाटे दरोडा घातला. तेथील दोन कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा चिंताजनक अवस्थेत आहे.

Robbery at petrol pump in Nagpur, murder of one | नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा, एकाची हत्या

नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा, एकाची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणा एमआयडीसी परिसरातील आऊटर रिंग रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी पहाटे दरोडा घातला. तेथील दोन कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा चिंताजनक अवस्थेत आहे. मृताचे नाव पंढरी श्रीरामजी भांडारकर (वय ६१, रा. वैभवनगरी, वानाडोंगरी) आणि जखमीचे नाव लीलाधर मारोतराव गोहते ( वय ५३, पूजा ले-आऊट, जयताळा) आहे.
उगले यांच्या मालकीच्या विद्या सर्वो पेट्रोल पंपावर ही घटना गुरुवारी पहाटे घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरची एक लाखाची रोकड लुटून नेल्याचेही उघड झाले आहे. पंढरी भांडारकर (वय ६१, जयताळा) आणि लीलाधर गवते (वय ५३) अशी दरोडेखोरांच्या क्रूरतेला बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यातील भांडारकर जागीच ठार झाले तर गवतेंची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी भांडारकर आणि गवते या दोघांची नाईट शिफ्ट होती. ग्राहक नसल्याने ते मध्यरात्री झोपले. पहाटेच्या सुमारास पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या उद्देशाने चार ते पाच सशस्त्र दरोडेखोर आले. त्यांनी झोपेतच दोन्ही कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड, तलवार आणि चाकूने हल्ला केला. भांडारकर यांच्या छातीत कुऱ्हाडीने घाव घातल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गवते गंभीर जखमी झाले. गुरुवारी भल्या सकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच एमआयडीसी आणि हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनीही भेट दिली. एमआयडीसी पोलिसांनी नंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करून ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला. फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सनाही बोलावून घेण्यात आले.
 

सात संशयितांची चौकशी सुरू
हत्या आणि दरोड्याच्या या घटनेमुळे हिंगणा एमआयडीसी परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी घटनास्थळ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी भेट दिली. त्यांनी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांच्याकडून घटनेची इत्थंभूत माहिती घेतली. त्याचप्रमाणे तपासा संदर्भात दिशानिर्देश दिले. दरम्यान, पोलिसांनी रात्री ८.३० पर्यंत सात संशयितांना ताब्यात घेतले होते. वृत्त लिहिस्तोवर त्यांची कसून चौकशी सुरू होती.

कुऱ्हाडीने फोडले लॉकर
सूत्रांच्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी भांडारकर आणि गवते यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातल्यानंतर त्याच कुºहाडीने लॉकर फोडले. त्यामुळे लॉकरवर रक्ताचे डाग पडले आहेत. नेमकी रक्कम किती ते दुपारपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, रोकड किमान एक लाख रुपये असावी, असा अंदाज पेट्रोल पंप संचालकांनी व्यक्त केल्याचे ठाणेदार खराबे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सीसीटीव्ही नादुरुस्त
पोलिसांनी ही घटना नेमकी कधी घडली, किती दरोडेखोर होते, त्यांनी कोणती शस्त्रे वापरली, कोणत्या मार्गाने पळून गेले, याचा शोध घेण्यासाठी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले; मात्र येथील सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बाजूच्या एका सीसीटीव्हीतून फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्या फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू केला.

Web Title: Robbery at petrol pump in Nagpur, murder of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.