भंडारा, नागपूर, गोंदिया आणि गुजरातमधील दरोड्याचा छडा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:13 AM2021-08-18T04:13:39+5:302021-08-18T04:13:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडाऱ्यातील सराफा व्यावसायिकाचे सुमारे ७५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडाऱ्यातील सराफा व्यावसायिकाचे सुमारे ७५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या बांधण्याची प्रशंसनीय कामगिरी गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बजावली. सहाजणांच्या या टोळीत नागपूर, मध्य प्रदेश आणि ओडिशातील गुन्हेगारांचा समावेश आहे.
ओम अशोक यादव (वय २६, रा, प्रतिभा लॉनच्या समोर कळमना), रघू कृष्णा यादव (२३, रा. कळमना), वासुदेव सागर यादव (२३, रा. कळमना), श्रावण सागर यादव (२१, रा. कळमना), राकेश विजय प्रधान (४०, रा. कोतरा, जि. कुराई, भोलेनाथ मंदिराजवळ ओडिशा) आणि चिरंजीव ऊर्फ शुभम संजय यादव (३१, इंद्रानगर बालाघाट, मध्य प्रदेश) अशी या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत.
भंडाऱ्यातील विनोद भुजाडे नामक सराफा व्यापाऱ्याची ७५ लाखांचे दागिने असलेली बॅग सोमवारी सकाळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. त्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना अलर्ट दिला. त्यानुसार, भंडाऱ्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात आले. त्यात दिसलेल्या एका वाहनाच्या आधारे येथील गुन्हे शाखेचे एपीआय मयूर चाैरसिया आणि पीएसआय बलराम झाडोकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने खबऱ्यांना कामी लागले. त्यावरून मंगळवारी दुपारी टीप मिळाली आणि पोलिसांनी हा गुन्हा करणाऱ्या टोळीचा छडा लावला. उपरोक्त सहा आरोपींना पोलिसांनी मंगळवारी कळमना भागातून ताब्यात घेतले. या टोळीने प्राथमिक तपासात पोलिसांना भंडाऱ्यात सोमवारी केलेली लूट तसेच नागपूर, गोंदिया आणि सूरत (गुजरात) मध्ये केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
---
सोन्याची तपासणी मध्यरात्रीपर्यंत सुरू
या टोळीच्या ताब्यातील सुमारे पाऊण कोटींचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांच्या देखरेखीत सराफाकडून त्या दागिन्यांची तपासणी आणि मूल्यांकन करण्याचे काम रात्री ११ पर्यंत सुरू होते. टोळीत आणखी सदस्य पुढील तपास सुरू आहे. या टोळीत आणखी काही सदस्य असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.
----