नागपुरात चाकूच्या धाकावर वर्दळीच्या ठिकाणी दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:54 PM2019-06-13T22:54:32+5:302019-06-13T22:55:12+5:30

स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी अडीच लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंजमधील वर्दळीच्या जलाराम मंदिरानजीक गुरुवारी भरदुपारी ही घटना घडली. यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

A robbery on the tip of knife at crowd place in Nagpur | नागपुरात चाकूच्या धाकावर वर्दळीच्या ठिकाणी दरोडा

नागपुरात चाकूच्या धाकावर वर्दळीच्या ठिकाणी दरोडा

Next
ठळक मुद्देस्टील व्यापाऱ्याची रोकड लुटली : लकडगंजमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टील व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी अडीच लाखांची रोकड लुटून नेली. लकडगंजमधील वर्दळीच्या जलाराम मंदिरानजीक गुरुवारी भरदुपारी ही घटना घडली. यामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जयंत नारायणराव मडावी (वय ३१, रा. पिंपळगाव आर्वी, जि. वर्धा) हा तरुण सीताबर्डीच्या महाजन मार्केटमध्ये असलेल्या स्वानंद ट्रेडिंग कंपनीत कामाला आहे. स्वानंद ट्रेडिंग ही फर्म वानखेडे यांची असून, ते स्टील व्यापारी असल्याचे पोलीस सांगतात. जयंत मडावीकडे विविध व्यापाऱ्यांकडे असलेली उधारीची रक्कम गोळा करण्याची जबाबदारी आहे.
नेहमीप्रमाणे वानखेडे यांच्या कार्यालयातून एक लाख रुपये घेऊन जयंत गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास सीताबर्डीतून पल्सरने लकडगंजमध्ये आला. जलाराम मंदिराजवळच्या एका व्यापाऱ्याकडून त्याने १ लाख ४५ हजार ५७६ रुपये घेतले. आधीचे एक लाख आणि ही रक्कम स्कूल बॅगमध्ये ठेवून तो आपल्या पल्सर (एमएच ३१/डीएच ५९२४)ने निघाला. त्याला ही रक्कम बँकेत जमा करायची होती. दुपारी ३.३० ला तो जलाराम मंदिराजवळ गोकुळ भवनसमोर आला असता अचानक दोन दुचाकींवर आलेल्या पाच लुटारूंनी त्याला अडवले. चाकूचा धाक दाखवून लुटारूंनी त्याला मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लुटारूंनी जयंतच्या खांद्याला अडकवलेली रोख रकमेची बॅग हिसकावून नेली. अवघ्या पाच मिनिटात ही घटना घडली. जयंतने प्रारंभी मालकाला आणि नंतर लकडगंज पोलिसांना फोनवरून ही माहिती दिली.
व्यापाऱ्यांत खळबळ
भरदुपारी वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्याने पोलीस हादरले. व्यापारी वर्तुळातही प्रचंड खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. लुटारूंच्या शोधासाठी आजूबाजूला चौकशी केली. परिसरात नाकाबंदीही केली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्यात चाकूच्या धाकावर लुटमार झाल्याचे दिसून येते. दरम्यान, जयंतच्या तक्रारीवरून लकडगंजचे सहायक पोलीस उपनिरीक्षक उपाध्याय यांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हेगारांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: A robbery on the tip of knife at crowd place in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.