नागपुरात दहा मिनिटात २० लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 02:44 PM2020-11-26T14:44:52+5:302020-11-26T14:46:01+5:30
घरात कुणी नसल्याची संधी साधून एका बिल्डरच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने १७ लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण २० लाख, ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी दुपारी अवघ्या दहा मिनिटात ही धाडसी घरफोडीची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: घरात कुणी नसल्याची संधी साधून एका बिल्डरच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने १७ लाखांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण २० लाख, ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी दुपारी अवघ्या दहा मिनिटात ही धाडसी घरफोडीची घटना घडली. सायंकाळी ती उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संदीप श्रीराम नितनवरे (वय ४०) नामक बिल्डर राहतात. त्यांची पत्नी बाहेर गावी गेली असून बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास ते व्यक्तिगत कामानिमित्त बाहेर गेले होते. ४ वाजता बाहेरून घरी परत आले. तेव्हा त्यांना दुसऱ्या माळ्यावरच्या त्यांच्या निवासस्थानाच्या मुख्य दाराचा कोंडा कुलूप तुटून दिसले. चोरट्याने कपाटात ठेवलेली १७लाख रुपयांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा २० लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. नितनवरे यांनी हुडकेश्वर पोलिसांना कळविले. ठाणेदार प्रताप भोसले आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांचे पथक बोलवून घेतले. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. त्याआधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, ही धाडसी घरफोडीची घटना घडल्याचे कळाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी नितनवरे यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली. माहिती कळताच परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त अक्षय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार मराठे आदींनीही घटनास्थळी भेट दिली.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरूण नितनवरे यांच्या घरात शिरताना दिसतो./ अवघ्या दहा मिनिटात त्याने ही धाडसी घरफोडी करून रोकड तसेच दागिन्यांसह पोबारा केला. घटनेच्या १० मिनिटांपूर्वी एक कुरियर बॉय ही नितनवरे यांच्या घराच्या परिसरात आला होता. त्याने कुरियरचे पाकिट ठेवले आणि तिथून निघून गेला. एकूणच घटनाक्रम पाहता नितनवरे यांच्या निवासाची आणि दिनचर्येची चांगली माहिती असणाऱ्यापैकीच कुणीतरी ही घरफोडी केली असावी, असा संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी काही संशयितांची चौकशी चालवली आहे.