भविष्यात सैन्यदलांकडे राहणार रोबोट्सची ‘प्लाटून’; ओळखणार भाषा, करणार संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 07:40 AM2023-01-06T07:40:00+5:302023-01-06T07:40:01+5:30
Nagpur News भारतातदेखील भाषा ओळखणाऱ्या व संवाद साधू शकणाऱ्या ‘रोबो’वर काहीजण संशोधन करत आहेत. भविष्यात मोहिमांवर जाणाऱ्या सैन्यदलांकडे रोबोट्सची ‘प्लाटून’ असेल, असे मत ‘आयआयटी दिल्ली’चे प्राध्यापक प्रा. रोहन पॉल यांनी व्यक्त केले.
योगेश पांडे
नागपूर : सद्यस्थितीत सैन्यशक्तीच्या आधारावर कुठल्याही देशाचे सामरिक सामर्थ्याचे मूल्यमापन होते. मात्र, भविष्यात युद्धाचे तंत्रदेखील संपूर्णत: बदलेल व सैन्यात ‘रोबोट्स’ महत्त्वाची भूमिका पार पाडतील. अनेक मोठ्या देशांत प्रत्यक्ष युद्धस्थळी सैनिकांच्या ‘ऑर्डर्स’चे पालन करणाऱ्या ‘रोबोट्स’वर प्रयोग सुरू सुरू असून, भारतातदेखील भाषा ओळखणाऱ्या व संवाद साधू शकणाऱ्या ‘रोबो’वर काहीजण संशोधन करत आहेत. भविष्यात मोहिमांवर जाणाऱ्या सैन्यदलांकडे रोबोट्सची ‘प्लाटून’ असेल, असे मत ‘आयआयटी दिल्ली’चे प्राध्यापक प्रा. रोहन पॉल यांनी व्यक्त केले.
‘इंडियन सायन्स काॅंग्रेस’मध्ये त्यांनी ‘रोबोटिक्स’ विषयावर जगभरात सुरू असलेल्या संशोधनांबाबत माहिती दिली. अनेक दुर्गम भागांमध्ये आपत्कालीन स्थितीत सैनिकांना मोहिमांवर जावे लागते. त्यांना संबंधित भागाची काहीच ओळख नसते. तेथे कुठला धोका आहे, कुठे भूसुरूंग आहेत का किंवा सैनिक दबा धरून बसले आहेत का? याची माहिती मिळत नाही. मात्र, ‘रोबोट्स’मुळे हे सहज शक्य होणार आहे. हे ‘रोबोट्स’ समोरील वस्तू ओळखून त्याला बाजूला करून सैनिकांना मार्ग मोकळा करून देतील. तसेच ते धोका असल्याची सूचना सिग्नल्स किंवा प्रत्यक्ष संवादातून देतील. भारतातदेखील अशाप्रकारे संवाद साधणाऱ्या व अडथळे दूर करणाऱ्या ‘रोबोट्स’वर ‘डीआरडीओ’ व ‘आयआयटी’त संशोधन सुरू असून, प्राथमिक निरीक्षणे अतिशय सकारात्मक आली आहेत, असे पॉल यांनी सांगितले.
‘रोबोट्स’मध्ये असेल निर्णय क्षमता
अत्याधुनिक व मल्टीमॉडेल सेन्सिंग असलेले ‘रोबोट्स’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत ‘रोबोटिक प्रणाली’त सातत्याने नियंत्रण आवश्यक असते. मात्र, भविष्यातील आव्हाने डोळ्यासमोर ठेवून जे प्रयोग सुरू आहेत, त्यात एखादी समस्या किंवा सूचना समजून परिस्थितीच्या हिशेबाने निर्णय घेण्याची क्षमता असलेले ‘रोबोट्स’ तयार करण्यावर भर देण्यात येत आहे, असे डॉ. पॉल यांनी सांगितले.