रोबोट करणार गावाची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:27 AM2017-09-19T00:27:01+5:302017-09-19T00:27:33+5:30

एक रोबोट तुमच्या गावातील कचरा साफ करतोय, एवढेच नव्हे तर एक पैसाही खर्च न करता एका डिव्हाईसद्वारे फुकटात वीज मिळाली तर, ....

Robot will clean the village | रोबोट करणार गावाची साफसफाई

रोबोट करणार गावाची साफसफाई

googlenewsNext
ठळक मुद्देधुरखेडा होणार देशातील पहिले सायन्स ग्राम : तरुण वैज्ञानिक वहाबचा संकल्प

निशांत वानखेडे। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एक रोबोट तुमच्या गावातील कचरा साफ करतोय, एवढेच नव्हे तर एक पैसाही खर्च न करता एका डिव्हाईसद्वारे फुकटात वीज मिळाली तर, तुम्हाला वाटेल या भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरतील काय? कदाचित काळ या शक्यता ठरवेल. पण आतातरी एका तरुण वैज्ञानिकाने त्याच्या गावात या कल्पना सत्यात उतरविण्याचा संकल्प सोडलाय. नासामध्ये काही दिवस प्रशिक्षण घेऊन परतलेल्या या वैज्ञानिकाने त्याचे गाव देशातील पहिले ‘आॅटोनॉमस सायन्स ग्राम’ म्हणून विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. वहाब लतीफ शेख असे या तरुण वैज्ञानिकाचे नाव आणि तो उमरेडजवळच्या धुरखेडा या गावात सायन्स पार्क निर्मितीचे स्वप्न साकारतोय.
उमरेडहून चार किमी दूर वसलेले धुरखेडा हे खेडेगाव. वहाब लतीफ शेख हा याच गावचा. उमरेडच्या बाजारासाठी लोकांना पायी प्रवास करावा लागतो अशा या गावात सायन्स पार्क निर्माण करून आॅटोनॉमस गाव म्हणून विकसित करणे हे वहाबचे स्वप्न. कुठलाही राजकीय पाठिंबा नाही की कुणाची मदत नाही. तरीही हे अवाढव्य स्वप्न त्याने बाळगले आणि त्यासाठी तयारी सुरू केली. हे स्वप्न तो पाहू शकतो, कारण त्याचा स्वत:चा प्रवासही असाच शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे. अतिशय बिकट परिस्थितीमुळे ११ वीनंतरचे शिक्षण आणि गाव दोन्ही त्याला सोडावे लागले. अर्थार्जनासाठी नागपुरात येऊन कुठल्यातरी गॅरेजमध्ये काम त्याने सुरू केले. त्याच्यातील तंत्रज्ञानाचा ‘किडा’ त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. मात्र काहीही करण्यापेक्षा योग्य ज्ञान मिळविणे हे त्याला पटले. मग त्याने विज्ञान, तंत्रज्ञानासह अभियांत्रिकी, एम.टेक. व त्यापुढची पुस्तके वाचण्याचा सपाटा सुरू केला. हे वाचताना ही थिअरी प्रत्यक्ष उपयोगात कशी आणता येईल याचे प्रयोग त्याने केले व तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणणाºया संस्थांना दाखवू लागला. वहाबच्या कौशल्यामुळे सैन्यदलासाठी सैनिकी साहित्य विकसित करणाºया तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एका संस्थेत त्याला नोकरी मिळाली. याच काळात रायसोनी महाविद्यालयात वैज्ञानिक म्हणून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची नोकरीही त्याने केली. याच काळात बर्फाळ आणि दुर्गम भागात सैन्याचे सामान व जखमी सैनिकांना वाहून नेणाºया बिग डॉग रोबोट व २०० किलो वजन उचलणारा रोबोटिक सूट तयार करण्याची संकल्पना मांडली. त्याची फ्लार्इंग कारची कल्पनाही अशीच भन्नाट.
याच संकल्पनेमुळे २०१५ मध्ये अमेरिकेच्या ‘नासा रोव्हर’ उपक्रमाअंतर्गत १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली. हे प्रशिक्षण पूर्ण करून तो परतला. नासाने नोकरी दऊ केली होती, मात्र आपल्या देशासाठी काम करायचे म्हणून परतल्याचे तो सांगतो. परतल्यानंतर नोएडाच्या संस्थेमध्ये नासा रोव्हरसाठी जाऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांना मेन्टर म्हणून प्रशिक्षण दिले. एक तरुण वैज्ञानिक म्हणून त्याने आपला ठसा उमटविला आहे. सध्या तो सैन्यासाठी रोबोटिक साहित्य विकसित करणाºया प्रकल्पामध्ये सहभागी आहे. विशेष म्हणजे देशातील अग्रणी वैज्ञानिक विजय भटकर यांनीही वहाबच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.
असे असेल आॅटोनॉमस धुरखेडा
धुरखेडा सायन्स पार्कसारखे विकसित होईल. सर्व तंत्रज्ञानाने व्यापले असेल. यामध्ये इच्छा असेल त्याला कधीही इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, रोबोटिक्स, एअरोनॉटिक्स, आॅटोमोबाईल्स, संगणक आदींचे थिअरी व प्रत्यक्ष प्रयोगासह प्रशिक्षण घेऊ शकेल. यात वयाचे बंधन नसेल. गावाच्या भिंतीवरही विज्ञान, गणिताचे सूत्र रेखाटले असतील. संशोधनाची मोठी प्रयोगशाळा, ई-लर्निंग स्कूल येथे राहील. गावातील मुलांसह देशातील कुणीही येथे प्रशिक्षणासाठी येऊ शकतील. नासाच्या प्रशिक्षणादरम्यान सोबत असलेले माहिप सिंग, आस्था सिंग व राजेंद्र हे प्रशिक्षक म्हणून राहणार आहेत. याशिवाय देशातील वैज्ञानिक व फॅकल्टी दर महिन्याला मुलांच्या मार्गदर्शनाला येणार असल्याचे वहाबने स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी पैसा महत्त्वाचा आहे. शासन व सामाजिक संस्थांची मदत अपेक्षित आहे. मात्र त्यापूर्वी गावात बॉयोनिक अवयव निर्मितीचे केंद्र स्थापन करून पैसा उभारण्याचा विचारही त्याने मांडला आहे. यामुळे पैसा आणि गावातील लोकांना रोजगारही मिळेल, असा विश्वास त्याला आहे.
छोटी सुरुवात
१६ सप्टेंबरला या सायन्स पार्क उभारणीच्या कामाचे औपचारिक उद््घाटन झाले. वहाबने गावकºयांना एक स्वप्न दाखविले असून त्याच्या ध्येयासाठी गावातील प्रत्येक नागरिक या कामात सहभागी होता. लोकांनी स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ केले. ५०० झाडे लावण्यात आली. आता गावकरी व वहाबचे मित्र प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या तयारीला लागले आहेत. यात दररोज कार्यशाळा होणार असून यामध्ये सध्या मुलांना रोड सफाई करणारा रोबोट बनविणे, फ्री इलेक्ट्रिसिटी, हवेचे पाणी तयार करणे व इतर प्रयोगांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यात इथिओपिया या देशातील सहा विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येणार असल्याचेही त्याने नमूद केले.

Web Title: Robot will clean the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.