वर्षभरात मेडिकलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 08:40 PM2019-06-14T20:40:04+5:302019-06-14T20:41:20+5:30
स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठान समितीने यंत्राच्या खरेदीसाठी १६ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठान समितीने यंत्राच्या खरेदीसाठी १६ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यात १० टक्के निधी लवकरच मिळणार असून प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यावर उर्वरित ९० टक्के निधी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, निधी कमी पडल्यास उर्वरित दोन कोटीचा निधी उपलब्धही करून दिला जाणार आहे.
मेडिकलच्या रुग्णांना रोबोटिकसारख्या उच्चप्रतिची सेवा देण्यासाठी शल्यक्रिया विभागाने पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावाला गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली होती. यातील पहिल्या टप्प्यातील १६ कोटी ८० लाखांचा निधी जिल्हा वार्षिक योजनांतर्गंत खनिकर्म विभाग उपलब्ध करून देणार होते. यालाही शासनाने मंजुरी दिली. परंतु ३१ मार्च २०१९ पर्यंत पुनर्विनियोजनाद्वारे हा निधी प्राप्त न झाल्याने प्रशासकीय मान्यता आपोआप रद्द झाली. पालकमंत्री बावनकुळे यांनी मेडिकलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले. यात जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या समितीने शस्त्रक्रियेला लागणाऱ्या रोबोटिक यंत्रांसाठी १६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी कमी पडल्यास चार-पाच आरोग्य संस्था मिळून जिल्हा नियोजन समितीकडून दिल्या जाणाºया ३२ कोटींमधून दोन कोटीही उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे या वर्षभरात रोबोटिक शस्त्रक्रियेचा फायदा गरीब व सामान्य रुग्णांना होण्याची शक्यता आहे.
-गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत यशस्वीतेचे प्रमाण वाढते, रोबोटिक तंत्रामुळे शस्त्रक्रियेदरम्यान स्नायूंची जास्त चिरफाड होत नाही. यामुळे वेदना कमी होतात. कमी प्रमाणात रक्त वाया जाते. मानवाच्या तुलनेत यांत्रिक रोबोट हा शरीरात ३६० डिग्रीपर्यंत फिरतो. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीतेचे प्रमाण वाढते. यांत्रिकी पद्धतीने टाके लावण्याची प्रक्रिया सोपी होते. मेडिकलच्या बहुतांश लेप्रोस्कोपी पद्धतीच्या शस्त्रक्रिया यांत्रिकी पद्धतीने झाल्यास शस्त्रक्रियांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
-केवळ ‘एम्स’मध्ये रोबोटिक सर्जरी
भारतात सध्या सुमारे १०० शस्त्रक्रिया करणारे यांत्रिक रोबोट आहेत. यातील बहुतांश पुणे, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई व दिल्लीच्या खासगी रुग्णालयांमध्ये आहे. शासकीय संस्थेपैकी केवळ ‘एम्स’मध्ये हा रोबोट उपलब्ध आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये हे यंत्र उपलब्ध झाल्यास याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होऊ शकेल.