शस्त्रक्रियांच्या मर्यादेवर रोबोटिक्सची मात : अभिनव देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:02 AM2019-04-27T00:02:53+5:302019-04-27T00:04:31+5:30
मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांनी दिली.
विज्ञान भारतीद्वारे व नीरीच्या सहकार्याने नीरीच्या सभागृहात आठ दिवसीय ‘विज्ञान संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान संस्कार शिबिरामध्ये ‘कॅन रोबोट एंटर इन बॉडी अॅण्ड परफॉर्म ऑपरेशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपक्रमाच्या समन्वयिका वसुंधरा साठे विशेषत्वाने उपस्थित होत्या.
रोबोटिक्स सर्जरीचा उगम कसा झाला हे सांगताना डॉ. अभिनव देशपांडे म्हणाले, युद्ध मैदानावरील रुग्णांपर्यंत डॉक्टर प्रत्यक्ष पोहचू शकत नसल्याने दुरवरून उपचार कसा होईल याचा विचार करताना अमेरिकेमध्ये रोबोटिक्स सर्जरीचा विचार करण्यात आला. यासंदभार्तील अभ्यास स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि नासा यांनी १९८० च्या दशकात केला व त्यामुळे रणमैदानावरील सैनिकांवर ‘टेलिप्रेजेंस’ म्हणजे दुरवरून रोबोट्सना आज्ञा करून प्रथमोपचार आणि अन्य छोट्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली, आणि त्यातून रोबोटिक्स सर्जरीचा उदय झाला.
रोबोटिक सर्जरीची संकल्पना स्पष्ट करताना डॉ. देशपांडे म्हणाले की, हे रोबोट्स केवळ मानवाच्या हातचे बाहुले आहे. रोबोट्सना स्वत:ची बुद्धी नसते. त्यामागे शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यचिकित्सकाची बुद्धी आणि कौशल्य असते. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे कमीत कमी चिरा दिला जातो. रुग्णाचे रक्त कमी जाते. यामुळे इस्पितळात कमी दिवस रहावे लागते. शस्त्रक्रियेत अचूकता येते. रोबोटिक्स आर्मला संवेदना जाणवत नाही, त्यामुळे फार अभ्यास करून शस्त्रक्रिया करावी लागते व यंत्र महागडे असल्याने सामान्यांच्या आवाक्यात नाही, अशा काही त्रुटी त्यांनी यावेळी सांगितल्या.
दुसऱ्या सत्रामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल व्हीएनआयटीचे प्रा. डॉ. कार्तिक बालसुंदन यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी नीरीच्या विविध प्रयोगशाळांना भेटी दिल्या. या शिबिरासाठी ३० शाळांमधील १६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. उपक्रमासाठी वसुंधरा साठे, वैदेही साठे, सतीश घारे, देहाडकर, एस एस गड, अजित शुक्ला, गिरीश जोशी, डॉ रश्मी शुक्ला, देवशीष जोशी, आशिष जैन, सुयोग गुर्जर, रोहित गणोरकर, नरेश चाफेकर हे परिश्रम घेत आहेत. नीरीतर्फे आशिष शर्मा, डॉ राजेश बिनीवाले यांचे सहकार्य लाभले.