हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील दरोड्याचा छडा

By admin | Published: August 21, 2015 03:30 AM2015-08-21T03:30:50+5:302015-08-21T03:30:50+5:30

हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील गार्डला गंभीर जखमी करून एक लाख रुपये लुटून नेणाऱ्या आरोपींना हुडकून काढण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने यश मिळवले.

A rod in the petrol pump in Hudakeshwar | हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील दरोड्याचा छडा

हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील दरोड्याचा छडा

Next

सहा आरोपी गजाआड : गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी
नागपूर : हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील गार्डला गंभीर जखमी करून एक लाख रुपये लुटून नेणाऱ्या आरोपींना हुडकून काढण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने यश मिळवले. या दरोड्यातील सात पैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून दोन कार तसेच मोबाईलसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
पेट्रोल पंपावर संजय भाऊराव गजभिये (वय ५०, रा. रा. स्वामीधाम इसेंन्सी, घोगली) हे बेसा, बेलतरोडी मार्गावरील इंडियन आॅईल पेट्रोल पंपावर सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यावर होते. ३ आॅगस्टच्या पहाटे २.३० ते २.४५ च्या सुमारास लुटारू आले आणि त्यांनी गजभियेंना मारहाण करून कार्यालयातील एक लाख रुपयांची रोकड लुटून नेली. गुन्हेशाखेच्या पोलिसांना या दरोड्यात स्विफ्ट कार वापरल्याची माहिती कळाली. तो धागा धरून पोलिसांनी तपास केला. कारमालकाने घटनेच्या काही तासांपूर्वी सेंटर पॉर्इंट हॉटेलसमोरून ही कार चोरी गेल्याची माहिती दिली. पूर्वनियोजित कटानुसार आरोपी शानू शुक्ला हॉटेल सेंटर पॉर्इंटसमोर उभा होता. कारमालक (एमएच ३१/ सीके २२४३) येताच समोर जाऊन शानूने त्याला सॅल्यूट केला आणि आपण हॉटेलचे कर्मचारी आहोत, पार्किंगमध्ये कार लावतो, असे सांगत कारमालकाकडून चावी घेतली. पोलिसांनी त्याआधारे तपास करून आरोपींचे धागेदोरे जुळविले. त्यानंतर शानू जयनारायण शुक्ला (वय २३, रा. बजरंगनगर), अखिल प्रकाश वांडरे (वय २१, रा. रमजीवीनगर) निखील अरविंद गिरी (वय २४, रा. गंगानगर), अक्षय लक्ष्मणराव अबलनकर (वय २०, रा. रामेश्वरी), विक्की ऊर्फ रिंक्या राजू खोंडे (वय २१, रा. कुकडे ले आऊट), प्रशांत दिनेश तामने (वय २१, रा. कैलास नगर) यांना अटक केली. या दरोड्याची टीप राजू नामक व्यक्तीकडून आरोपींना मिळाली. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचेही तरवडे यांनी सांगितले. यावेळी गुन्हेशाखेचे उपायुक्त (डिटेक्शन) रंजन शर्मा आणि उपायुक्त (ईओडब्ल्यू) तसेच एसीपी नीलेश राऊत यांनीही या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात वेगवेगळी माहिती दिली. (प्रतिनिधी)
चोरीच्या रकमेतून घेतली कार
आरोपींनी रोकड लुटल्यानंतर त्यातून एक जुनी सेलो कार विकत घेतली. या कारने गुन्हे करण्याची त्यांची योजना होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रशांत तामने हा वगळता सर्व आरोपी मध्य प्रदेशात लपून बसले होते. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, एपीआय प्रशांत चौगुले, हवालदार सुखदेव मडावी, महादेव सातपुते, राजू डांगे, मिलिंद मून, संजय देवकर, नायक संदीप गवळी, जयंत सेलोटे, गोपाल देशमुख, सतीश निमजे, रामकैलास यादव आणि रवी राऊत यांनी तेथे जाऊन आरोपींना अटक करण्याची कामगिरी बजावली.

Web Title: A rod in the petrol pump in Hudakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.