रोडगा; अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेने राखलेले संस्कृतीचे संचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:33 PM2018-01-18T15:33:53+5:302018-01-18T15:35:07+5:30
देवीच्या भारूडात भवानी आई रोडगा वाहीन तुला, अशी जी आळवणी केली जाते त्यातील रोडगा हा पदार्थ वऱ्हाडातील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य अंग मानला जातो.
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देवीच्या भारूडात भवानी आई रोडगा वाहीन तुला, अशी जी आळवणी केली जाते त्यातील रोडगा हा पदार्थ वऱ्हाडातील ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य अंग मानला जातो. तसंही आपल्या देशातील एका प्रांतात विशिष्ट पद्धतीने बनविलेला पदार्थ हा दुसऱ्या प्रांतातही थोड्याफार फरकाने बनविला जात असल्याचे आपण पाहतो. जसे, महाराष्ट्रातील पुरणपोळी आंध्रात बुरेलू नावाने तळल्या जाणाऱ्या गोड बोंडाच्या रुपात पहायला मिळते किंवा दिवाळीचा दिमाखदार अनरसा तामिळनाडूसह अन्य दाक्षिणात्य राज्यांत अद्दरस्सम नावाने काळे तीळ लावून आवडीने चाखला जातो. रोडगाही याला अपवाद नाही.
विदर्भ-वऱ्हाडात ज्याला आपण रोडगा म्हणतो, तोच राजस्थानात गेला की तेलातुपात घोळून दालबाटी होतो आणि बिहारात गेला की वांग्याच्या भरीतासोबत खाल्ल्या जाणाऱ्या सत्तूच्या पीठाने बनविलेला, लिट्टी चोखा होतो.
प्राचीन काळात युद्धावर निघालेल्या सैनिकांनी कदाचित हा पदार्थ प्रथम तयार केला असावा किंवा देशाटनाला जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या खाद्यकल्पनेचा तो अविष्कार असावा असे वाटते.
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार व परतवाडा तालुक्यांदरम्यान असलेल्या बहिरम या धार्मिक स्थळावर या रोडग्याचे महत्त्व अधोरेखित होते. बहिरमच्या यात्रेला जाणे म्हणजे रोडगा व वांग्याची तिखट, चमचमीत भाजी खाणे हे प्रसाद ग्रहणाएवढेच महत्त्वपूर्ण असते.
रोडगा म्हणजे कणकेच्या जाड पोळ्याचे एकावर एक जाड थर लावून ती गुंडाळी गोवऱ्यांवर भाजून बनवलेला पदार्थ होय. रोडगा हा लहान मोठ्या अशा दोन आकारात बघायला मिळतो. काही रोडगे हे छोट्याशा गोळ्याच्या स्वरुपातले तर काही भल्या थोरल्या आकारातले. रोडगा बनवण्याचे काम प्रामुख्याने पुरुषांचेच. रोडग्यासाठी लागणारे गव्हाचे पीठ हे जाडसरच असायला हवे. त्यात ओवा, तीळ व तेल टाकून ते भिजवले जाते. त्याच्या जाडसर पोळ्या लाटून त्या पोळांना एकमेकांवर रचून त्याचा पुन्हा गोळा तयार केला जातो. हा गोळा मग गोवऱ्यांवर ठेवून भाजला जातो. भाजलेले रोडगे एका पोत्यात ठेवून रगडले की त्यावरची राख व माती निघून जाते. मग हा गरमागरम रोडगा फोडून त्याचा एकेक तुकडा पंगतीत वाढला जातो. रोडग्यासोबत वांग्याची भाजी असा निश्चित मेनू असतो. रोडगा तीन ते चार दिवस टिकणारा असल्याने तो प्रवासातही नेता येतो. काही सुगरणी रोडग्याच्या मधल्या भागाचा चुरा करून त्यात गूळ घालून त्याचे लाडूही बनवतात. असे हे रोडगे आणि आलूवांग्याचा रस्सा (खास वैदर्भीय शब्द) बहिरमच्या यात्रेत तात्पुरत्या उभारलेल्या एखाद्या राहुटीत बसून खाल्ले की आपण आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून आहोत याचेही मग एक समाधान मिळवता येऊ शकते.