रोहित्र चोरीचे रॅकेट सक्रिय!
By admin | Published: August 6, 2014 12:58 AM2014-08-06T00:58:55+5:302014-08-06T00:58:55+5:30
अमरावतीत ७४ रोहित्रांची चोरी
अकोला : राज्यात विद्युत रोहित्र चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून, यामागे रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमरावती परिमंडळात गत दोन वर्षांमध्ये ७४ रोहित्रांची चोरी झाली असून, वाढत्या चोर्यांमुळे महावितरणला कोट्यवधीचा फटका सोसावा लागत आहे. महावितरणतर्फे गावोगावी विद्युत वाहिन्यांसह वेगवेगळय़ा क्षमतेची रोहित्रे बसवून लोकांना वीज देण्याची व्यवस्था करण्यात आली; मात्र गत दोन वर्षांपासून विद्युत तारा व रोहित्र चोरीच्या घटना घडत आहेत. अमरावती परिमंडळात गत दोन वर्षांत ७४ रोहित्र चोरी गेली आहेत. त्यामुळे अखंड विद्युत पुरवठा करण्यात महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्युत रोहित्र चोरी करताना विजेचा धक्का लागण्याची भीती असते. त्यामुळे या चोर्यांमागे जाणकार व्यक्ती सहभागी असाव्यात, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रोहीत्र चोरी केल्यानंतर तांबेची तार, त्यामध्ये असलेले इन्सुलेटीव्ह ऑइल कोण विकत घेऊ शकते, याचीही माहिती या क्षेत्राशी संबंधीत व्यक्तीलाच असते. उपकेंद्र, रोहित्रे, विविध क्षमतेच्या ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड विद्युत वाहिन्या राज्यभर उभारण्यात आल्या आहेत. नागरी वस्तीसह डोंगराळ भाग, वने व गावागावांमध्ये उभारण्यात आलेल्या विद्युत साहित्याचे रक्षण करणे महावितरणला अवघड जात आहे. शासकीय मालमत्ता असल्यामुळे नागरिकांचे याकडे लक्ष नसते. त्यामुळे चोरट्यांचे फावते. रोहीत्र चोरी गेल्यानंतर ते पुन्हा बसविण्याकरिता महावितरणला लाखो रूपये खर्च करावे लागतात. त्यानंतरही रोहित्र चोरी होणार नाही, याची शाश्वती नसते. पोलिसांमध्ये तक्रार करूनही, अमरावती परिमंडळात अद्याप एकाही चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.