जिल्हाधिकारी अश्विन मुदगल मार्गदर्शकाच्या भूमिकेतही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:11 AM2019-04-23T00:11:29+5:302019-04-23T00:12:31+5:30
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान पहिल्याच टप्प्यात पार पडले. आता मतमोजणीची तयारी सुरू आहे. त्याला आणखीन महिनाभर वेळ असल्याने निवडणूक विभाग व अधिकारी थोडे निश्चिंत आहे. परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना सध्या मार्गदर्शकाचीही भूमिका बजवावी लागत आहे. कारण ज्या ठिकाणी आता मतदान होणार आहे, तेथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे त्यांच्याकडून मतदानाचे नियोजन व एकूणच तयारीबाबत माहिती जाणून घेत आहेत. जिल्हाधिकारी मुदगलसुद्धा त्यांना केवळ माहितीच नव्हे तर एकूणच नियोजनाची काटेकोर माहिती करून देत मदत करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान पहिल्याच टप्प्यात पार पडले. आता मतमोजणीची तयारी सुरू आहे. त्याला आणखीन महिनाभर वेळ असल्याने निवडणूक विभाग व अधिकारी थोडे निश्चिंत आहे. परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना सध्या मार्गदर्शकाचीही भूमिका बजवावी लागत आहे. कारण ज्या ठिकाणी आता मतदान होणार आहे, तेथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे त्यांच्याकडून मतदानाचे नियोजन व एकूणच तयारीबाबत माहिती जाणून घेत आहेत. जिल्हाधिकारी मुदगलसुद्धा त्यांना केवळ माहितीच नव्हे तर एकूणच नियोजनाची काटेकोर माहिती करून देत मदत करीत आहेत.
देशातील लोकसभा निवडणुका या एकूण सात टप्प्यात होणार आहेत. महाराष्ट्रात त्या चार टप्प्यात पार पडतील. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान हे पहिल्याच टप्प्यात पार पडले. एकूण नियोजनासाठी कमी कालावधी मिळाला असला तरी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात निवडणूक विभागासह एकूणच प्रशासनाने मतदानापर्यंतचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे. यावेळी निवडणूक विभागाचे निवडणूक विभागाला अनेक नवीन निर्देश होते. त्यात मतदान केंद्रांवर दिव्यांगांना सोई सुविधा पुरविण्यापासून तर मतदान केंद्रावर लाईव्ह नजर ठेवण्यापर्यंतचा समावेश होता. या दोन्ही बाबतीत नागपूर जिल्ह्याचे कार्य सर्वांत उत्तम राहिले. दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रांवर विविध सुविधा पुरवण्यासाठी निवडणूक आयोगाने एक स्वतंत्र अॅप तयार केला होता. त्याचा यथोचित उपयोग करून घेण्यासाठी नागपुरात स्वतंत्रपणे समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्यात आली. जवळपास ४५० मतदान केंद्रांवर लाईव्ह वेब कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात संवेदनशील मतदान केंद्रासह इतर केंद्रांवरही प्रत्यक्ष मतदनावर थेट नजर ठेवता आली. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. गेल्या निवडणुकीचा विचार केल्यास यंदा मतदार यादीतील घोळाबाबत फारशा तकारी आढळून आल्या नाहीत. पहिल्या टप्प्यातील एकूण मतमोजणीपर्यंतचा टप्पा यशस्वीपणे पार पडल्याने इतर भागातील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नागपूरकडे विशेषत्वाने लक्ष ठेवून आहेत.
त्यामुळे मतमोजणीपर्यंतच्या नियोजनाबाबत ते जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे विचारणा करीत आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीसुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला असून आपण त्यांना योग्य ते सहकार्य करीत असल्याचे सांगितले आहे.
निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनाही असाच अनुभव
महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुका २३ एप्रिल रोजी होणार आहेत. तर चौथ्या टप्प्याच्या निवडणुका २९ एप्रिल रोजी होतील. जिल्हाधिकारी मुदगल यांना ज्याप्रकारे त्यांच्या समकक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजनाबाबत विचारणा करीत मदत मागितली जात आहे. तसाच अनुभव नागपूरच्या निवडणूक विभागातील इतर अधिकाऱ्यांनाही येत आहेत. उपजिल्हानिवडणूक अधिकाऱ्यांपासून तर इतर अधिकाऱ्यांनाही इतर जिल्ह्यातील त्यांच्या समकक्ष व परिचित असलेल्या अधिकाऱ्यांकडून अशीच विचारणा होत असून नियोजनाबाबत मदत मागितली जात आहे. एकूणच नागपूर हे सध्या निवडणुकीसाठी इतरांना मार्गदर्शक ठरत आहे.