कोरोना रोखण्यासाठी व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची - डीसीपी साहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:07 AM2021-02-24T04:07:33+5:302021-02-24T04:07:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शहरात पुन्हा कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. तो रोखण्याची महत्वाची जबाबदारी व्यापारी बांधवांवर आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शहरात पुन्हा कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. तो रोखण्याची महत्वाची जबाबदारी व्यापारी बांधवांवर आहे. त्यांनी पोलिसांना सहकार्य करून हे संकट दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी आज केले.
कोरोना गर्दीमुळे वाढतो, हे माहीत असूनही अनेकजण बेजबाबदारपणे वागत आहेत. ठिकठिकाणच्या बाजारपेठेत विविध दुकानात मोठी गर्दी होत आहे. ती ध्यानात घेत पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी आज रात्री ९ च्या सुमारास सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनिस आणि आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत बाजारपेठेत पाहणी केली. पोलिसांनी गर्दी कमी करतानाच दुकानदारांनाही गर्दी टाळण्याचे आवाहन केले.
त्यानंतर उपायुक्त शाहू यांनी सीताबर्डी बाजारातील दुकानदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तसेच बार, हॉटेल संचालकांचीही बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाचे आक्रमण तीव्र होत असल्याने आपण सर्वांनी मिळून त्याचा सामना करण्याची गरज विशद केली. महापालिका आणि पोलिसांनी घालून दिलेले वेळेचे आणि गर्दीचे बंधन व्यापारी बांधवांनी पाळावे. आपल्या दुकानात गर्दी होणार नाही, प्रत्येक जण मास्क घालून राहील आणि थोड्या थोड्या वेळेनंतर सॅनिटायजरचा उपयोग करतील, याकडे लक्ष देण्याची विनंती केली.
---
व्यापाऱ्यांचे सहकार्याचे आश्वासन
व्यापाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ठाणेदार सबनिस यांनी व्यापारी बांधवांना कोरोनाच्या संबंधाने घालून दिलेल्या नियम आणि अटी शर्थींची माहिती दिली. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सर्व मिळून कोरोनाचे संकट परतवून लावू , असे सांगतानाच सहकार्याचे आश्वासन दिले.
---