उपराजधानीतील रुफटॉप रेस्टॉरंट्सनी नियम बसवले धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:50 AM2020-01-02T10:50:48+5:302020-01-02T10:51:24+5:30
नागपूर शहरातील सदर, रामदासपेठ, छावनी, अमरावती रोड, वर्धा रोड, धरमपेठ, लक्ष्मीनगर, सिव्हील लाईन्स इत्यादी परिसरात नियम धाब्यावर बसवून ५० वर रुफटॉप रेस्टॉरंट व बार कार्यरत आहेत.
राजीव सिंह।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात रुफटॉप रेस्टॉरंट व बारचे पीक आले असून हा फायद्याचा धंदा नियम पायदळी तुडवून जोरात सुरू आहे. महापालिका ठोस कारवाई करीत नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कुणाची राहील हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरातील सदर, रामदासपेठ, छावनी, अमरावती रोड, वर्धा रोड, धरमपेठ, लक्ष्मीनगर, सिव्हील लाईन्स इत्यादी परिसरात नियम धाब्यावर बसवून ५० वर रुफटॉप रेस्टॉरंट व बार कार्यरत आहेत. मुंंबई, दिल्ली वा अन्य मोठ्या शहरांत आग लागण्याची किंवा अन्य दुर्घटना घडल्यास कारवाई केली जाते. परंतु, काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. त्यामुळे अवैध रुफटॉप रेस्टॉरेन्ट व बार वर्षानुवर्षापासून धोकादायकरीत्या सुरू आहेत. नियमानुसार महापालिकेच्या अग्निशमन विभागाने एनओसी दिल्याशिवाय रेस्टॉरेन्ट व बार संचालित करता येत नाही. परंतु, यासंदर्भात अग्निशमन विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी कोणत्याही रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरेन्ट व बारला परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली. रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट बारवर शहरातील विविध भागात कार्यरत नऊ अग्निशमन केंद्रांद्वारे कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात सिव्हील लाईन्समधील ३, कॉटन मार्केटमधील ३, नरेंद्रनगरातील २ तर, सुगतनगरातील १ रुफटॉप रेस्टॉरंन्ट कारवाई करून बंद करण्यात आले. तसेच, सुगतनगरातील रुफटॉप रेस्टॉरंट संचालकाविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला.
यामुळे परवानगी दिली जात नाही
आग किंवा अन्य दुर्घटना घडल्यास नागरिकांना छतावर जाऊन मदत मागता यावी याकरिता इमारतीच्या छतावर बांधकाम करण्याची किंवा हॉटेल, रेस्टॉरंट व बार चालविण्याची परवानगी दिली जात नाही. छतावर आग लागल्यास चेंगराचेंगरी होण्याची भीती असते. त्या परिस्थितीत प्राणहानी व अन्य नुकसान अधिक प्रमाणात होते.
हिवाळ्यात अधिक धोका
हिवाळ्यात रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बारमध्ये ग्राहकांना शेकोटीची सुविधा दिली जाते. त्यासाठी अस्थायी शेडही उभारले जाते. वर्धा रोडवरील काही रेस्टॉरंटच्या छतावरच स्वयंपाकगृह चालविले जात आहे. तसेच, ग्राहकांनाही छतावरच भोजन दिले जाते. सीताबर्डी, सिव्हील लाईन्स व सदर या भागात अनेक अवैध रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बार आहेत. तेथे कधीही आग लागू शकते.
इंटरनेटवर लांबलचक यादी
इंटरनेटवर नागपुरातील रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बार सर्च केल्यास लांबलचक यादी पुढे येते. त्यातील सुविधांचीही माहिती दिली जाते. त्यामुळे अग्निशम विभाग हातावर हात ठेवून का बसला आहे, त्यांना मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का आणि दुर्घटनेत प्राणहानी झाल्यास कोण जबाबदार राहील असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परवानगी दिली नाही
अग्निशमन विभागाने कोणत्याही रुफटॉप हॉटेल, रेस्टॉरंट व बारला परवानगी दिली नाही. इमारत आराखड्याला नगर रचना विभाग मंजुरी देतो. परंतु, छतावर हॉटेल, रेस्टॉरंट व बार चालविण्याची परवानगी दिली जात नाही. अग्निशमन विभाग नियमांच्या अंमलबजावणीसाठी नियमित कारवाई व आवश्यक चौकशी करतो. धोका आढळून आल्यास संबंधितांना नोटीस जारी केली जाते.
- बी. पी. चंदनखेडे, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी.