सिमेंटमुळे बंदिस्त झालेल्या झाडांच्या मुळांनी घेतला मोकळा श्वास
By निशांत वानखेडे | Published: May 19, 2024 07:25 PM2024-05-19T19:25:55+5:302024-05-19T19:26:08+5:30
‘अजनी वन’ लढ्यातील तरुणांचे ‘डिचाेकिंग’ अभियान : विकासकांचा बेजबाबदारपणा उघड
नागपूर : ‘अजनी वन’ लढ्यातील तरुणांनी शहरातील झाडांच्या संवर्धनासाठी आता नवे अभियान सुरू केले आहे. रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी सिमेंटद्वारे झाडांच्या मुळांचा गाेठविलेला श्वास माेकळा करण्याचे हे अभियान आहे. रविवारी मानेवाडा परिसरात हे अभियान राबवून ५० च्यावर झाडांना सिमेंटच्या विळख्यातून माेकळे केले.
अजनी वन लढ्यात महत्त्वाचे याेगदान देणाऱ्या जाेसेफ जाॅर्ज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाचे नेतृत्व करणारे कुणाल माैर्य म्हणाले, झाडांची मुळे नैसर्गिक प्रक्रियेद्वारे पावसाचे पाणी शाेषून जमिनीतून आवश्यक अन्नद्रव्य मिळवितात. त्यासाठी शहरात रस्ते बांधकाम करताना झाडाच्या भाेवताल माेकळी जागा साेडणे आवश्यक व बंधनकारकही आहे. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून ही साधी गाेष्ट दुर्लक्षित केली जाते. तसेही गेल्या काही वर्षांत शहरात विकासाच्या नावाने बेमुरवतपणे झाडांची कत्तल सुरू आहे. अविचारीपणे नागपूरचे हरित वैभव नष्ट केले जात आहे. रस्ते बांधणारे कंत्राटदारही सिमेंटने झाडांचा बुंधा पूर्ण चाेक करून झाडांची नैसर्गिक क्रिया बंद करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मानेवाडा राेडवर अशी कितीतरी झाडे पाणी मिळत नसल्याने सुकली आहेत व सुकत चालली आहेत.
‘डिचाेकिंग’ अभियानाद्वारे अशा झाडांच्या बुंध्याभाेवतालचे सिमेंट खाेदून मुळे माेकळी केली जात आहेत. रविवारी सकाळी ८ वाजेपासून या तरुणांनी मानेवाडा ते बेसा राेड, घाेगली, हुडकेश्वरपर्यंत ५० च्यावर झाडांची मुळे माेकळी केली. या अभियानात दिवंगत जाेसेफ जाॅर्ज यांच्या पत्नी आचम्मा जाेसेफ, तसेच ज्येष्ठ पत्रकार जाेसेफ राव, जेनेट मेरी यांच्यासह ड्रीम फाॅर लाइफ फाउंडेशन व लीडर्स क्लबचे राेहन अरसपुरे, अपूर्व बावनगडे, नीरज कडू, ऋषभ, सुजल आदी तरुणांचा सहभाग हाेता. हे अभियान सातत्याने सुरू राहील व वृक्षप्रेमींनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन कुणाल माैर्य यांनी केले.