पोलिसांकडून गुलाबाचे फूल अन् प्रेमाचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:39 PM2020-12-31T22:39:40+5:302020-12-31T22:42:59+5:30
Police Roses and love advice शहरातील विविध भागांत नागरिकांना गुलाबपुष्प देऊन पोलिसांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सुरक्षित राहून घरीच सेलिब्रेशन करा, असा सल्लाही पोलिसांनी यावेळी नागरिकांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागांत नागरिकांना गुलाबपुष्प देऊन पोलिसांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सुरक्षित राहून घरीच सेलिब्रेशन करा, असा सल्लाही पोलिसांनी यावेळी नागरिकांना दिला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रात्री अकरा वाजल्यानंतर कोणत्याही ठिकाणी गर्दी करण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. नव्या वर्षाचे सेलिब्रेशन खासगीतच करा, असा सल्ला देत हॉटेल, पब, लाॅज यासारख्या ठिकाणी पार्टी करण्यासही मनाई केली आहे. रात्री अकरानंतर कोणतेही आस्थापना सुरू राहणार नाही, असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडू नये, अपघात होऊ नये, दारूच्या नशेत वाद आणि हाणामारीसारख्या घटना घडू नये म्हणूनही शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची तयारी बघण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार रात्री सात वाजता व्हेरायटी चौकात आले. शहरात तीन हजार पोलीस थर्टी फर्स्टचा बंदोबस्त सांभाळणार असून, कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची आम्ही काळजी घेत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ते निघून गेल्यानंतर अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विनीता शाहू, ठाणेदार अतुल सबनीस यांनी नागरिकांना गुलाबपुष्प देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दारूच्या नशेत वाहन चालवून स्वत:चा, तसेच दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका, घरीच सुरक्षित राहून नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करा, असा सल्लाही यावेळी या अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना दिला.