‘व्हॅलेंटाईन डे’ला १० ते १५ रुपयांत गुलाब! क्रिएटिव्ह भेटकार्डला जास्त मागणी
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 14, 2024 10:15 PM2024-02-14T22:15:11+5:302024-02-14T22:15:26+5:30
पूर्वीप्रमाणेच आजही तरूणाई उत्स्फूर्तपणे व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. मात्र त्यामध्ये काहीसा बदल झाला आहे.
नागपूर: व्हॅलेंटाईन डे आणि गुलाब यांचे वर्षानुवर्षांचे अतूट नाते. प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा लाल गुलाब व्हॅलेंटाईन या प्रेमदिनी महागला. १० रुपये प्रतिनग दर असलेल्या गुलाब फुलासाठी प्रेमदिनी १५ रुपये मोजावे लागले. २० फूलांचा बंडल ३०० रुपयांत विकला गेला. किरकोळ बाजारात मागणीनुसार आणखी दर वाढले. या प्रेमदिनी जिल्ह्यात गुलाब फूलांची उलाढाल एक कोटीवर गेल्याची माहिती आहे.
पूर्वीप्रमाणेच आजही तरूणाई उत्स्फूर्तपणे व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. मात्र त्यामध्ये काहीसा बदल झाला आहे. खरेखुरे गुलाब मैत्रिणीला किंवा मित्राला भेट न देता स्वस्तात मस्त म्हणत व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरूनच नकली गुलाबाची भेट म्हणून पाठवितात. विक्रेते म्हणाले, दोन दिवसांआधी गुलाबाला फारशी मागणी नव्हती. पण प्रेमदिनी भाववाढीनंतरही गुलाबाला प्रचंड मागणी होती. टवटवीत आणि मोठा दिसणारा गुलाब तरुण मंडळी खरेदी करतात. त्यामुळे या फूलांना जास्त भाव मिळतो. तसेच गुलाबांचे बुकेही अनेकजण खरेदी करतात. एरव्ही, हा बुके १०० रुपयांपर्यंत मिळतो. परंतु, प्रेमदिनी भाव २५० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचले. विक्रेते म्हणाले, आधुनिक काळात गुलाबाची शेती करण्याचे प्रमाण वाढल्याने बाजारपेठेत गुलाबाची आवक वाढली. त्यानंतरही प्रेमदिनी भाव वाढलेच. या दिवशी साध्या भेटकार्डपेक्षा क्रिएटिव्ह भेटकार्डला जास्त मागणी होती.
गुलाबाचे वेड पूर्वीसारखे नाही
भारतासारख्या विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यातच तंत्रज्ञानाच्या युगात तरुण-तरुणींमध्ये गुलाबाचे वेड पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्यामुळे सप्ताहभर चालणाऱ्या या प्रेमाच्या उत्साहात गुलाब फुलांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय फारसा राहिलेला नाहीत.