अंडा सेलमधून बाहेर येण्यासाठी रोशनची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 10:30 PM2021-06-09T22:30:43+5:302021-06-09T22:31:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तुरुंगातील अंडा सेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात रोशन शेख हा दीड महिन्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुरुंगातील अंडा सेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात रोशन शेख हा दीड महिन्यात दुसऱ्यांदा चर्चेत आला आहे. अंडा सेलमधून बाहेर येण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. यासाठी त्याने जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच आत्महत्येचा प्रयत्नही त्याने यासाठीच केला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे तुरुंगात खळबळ उडालेली आहे.
रोशन शेख यांच्याविरोधात खंडणी वसुली, अपहरण मारहाण आणि बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. एक वर्षापूर्वी गुन्हे शाखेने कारवाई केल्यानंतर रोशन गॅंग चर्चेत आली होती. शहरातील अनेक उच्चभ्रू परिवारातील महिला या टोळीला बळी पडल्या होत्या. परंतु बदनामीच्या भीतीने गुन्हे दाखल केले नव्हते. मुंबईतील एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून बलात्कार व खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात रोशनला अद्याप जामीन मिळालेला नाही. गुन्हे शाखेने रोशन, इरफान खान ऊर्फ खालू, सलीम काजी आणि सोहेल बरकाती यांना अटक केली होती. सोहेल व सलीमला जामीन मिळाला आहे. अभिषेक सिंह आणि अंकित पाली नावाचे आरोपी फरार आहेत. एक वर्षानंतरही त्यांचा पत्ता लागलेला नाही. सर्वांविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. २५ एप्रिल रोजी रोशन व अन्य एका कैद्यामध्ये तुरुंगात मारहाण झाली हाेती. धंतोली पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. यानंतर रोशनला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते.
मंगळवारी दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान रोशनने तुरुंगाात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अंडा सेलची देखरेख करीत असलेले शिपाई परेश बुटे यांनी तातडीने दरवाजा उघडून रोशनला पकडले. लगेचच अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली. रोशनची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. असे सांगितले जाते की, अंडा सेलमध्ये गेल्यापासून रोशन दु:खी होता. त्याला तेथून बाहेर निघायचे होते. परंतु त्याची एकूणच वर्तणूक पाहता तुरुंगातील अधिकारी त्याला अंडासेलमधून बाहेर काढण्यात तयार नव्हते. जामीन मिळवण्यासाठीही तो धडपडत आहे. त्यामुळेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर रोशनवर अधिक लक्ष ठेवले जात आहे.