एसटी महामंडळात रोष्टर २६ वर्षांपासून प्रमाणितच नाही
By नरेश डोंगरे | Published: July 14, 2023 08:14 PM2023-07-14T20:14:07+5:302023-07-14T20:14:41+5:30
अनेक कर्मचाऱ्यांना खातेनिहाय बढती: वर्ग ३ आणि ४ मधील नियुक्त्या, बढत्या वादाच्या भोवऱ्यात
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : एसटी महामंडळाच्या नागपूर प्रदेश कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत तब्बल २६ वर्षांपासून सरळ सेवा भरतीची बिंदू नामावली (रोस्टर) अद्ययावत (प्रमाणित) करण्यात आलेली नाही. तरीसुद्धा अनुकंपा तत्वावर नियमबाह्य नियुक्त्या करून काहींना खातेनिहाय बढतीही देण्यात येत असल्याचा आरोप आहे. तशी तक्रार वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्यामुळे वर्ग ३ आणि ४ मधील नियुक्त्या, बढत्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महामंडळात या विषयाच्या अनुषंगाने आरोपांसोबतच उलटसुलट चर्चेलाही उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मुंबई कार्यालयातील दालनात ५ जून २०२३ ला संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत महामंडळाच्या नागपूर प्रदेश कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यात १९९७ पासून रोष्टर प्रमाणित करण्यात आले नसल्याचा चर्चा उसळल्यामुळे नागपूरसोबतच अमरावती प्रदेशांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील रोष्टर १ महिन्याच्या आत विना सबब अद्ययावत करण्यात यावे, असा निर्णय झाला होता.
महाव्यवस्थापकांनी विभागातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी काय प्रयत्न केले त्याच्या माहितीसाठी साप्ताहीक आढावा घ्यावा. रेकॉर्ड रूम मधील दस्ताऐवजाचे पडताळणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड रूम तपासावी. जुन्या नस्ती तपासून बिंदूनामावली अदयावत करण्याबाबत गांभीर्याने दक्षता घ्यावी, असेही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची फारशी गांभिर्याने दखल घेण्यात आली नसल्याची चर्चा आहे.
या संबंधाने अकोला येथील प्रभाकर पी. गोपनारायण यांनी नागपूर येथील सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) यांना १२ जुलैला एक सविस्तर तक्रार देऊन २६ वर्षांपासून बिंदू नामावली प्रमाणित नसताना सरळ सेवा भरती अंतर्गत नियुक्त्या व पदोन्नती कशा झाल्या, असा सवाल केला आहे. या नियुक्त्या आरक्षण अधिनियम २००१ चे उल्लंघन असून त्यासाठी नागपूर विभागातील सर्व विभाग नियंत्रक मागासवर्गिय कक्षात काम करणारे सर्व कर्मचारी अधिकारी जबाबदार असल्याचाही आरोप केला आहे. या एकूणच नियुक्त्या आणि पदोन्नतींची प्रकरण संशयास्पद असल्याने महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील रोष्टरची तपासणी करावी, संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करावी आणि पात्र असूनही अन्याय झालेल्या मागासवर्गियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गोपनारायण यांनी केली आहे. त्यामुळे वर्ग ३ आणि ४ मधील नियुक्त्या, बढत्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
नोकरभरती घोटाळा उजेडात येण्याची शक्यता
भरतीसाठी आंतर प्रादेशिक आंतर विभाग अनुकंपा तत्त्वावर बिंदूंनामावली प्रमाणितच करण्यात आली नाही. दुसरे म्हणजे, टक्केवारीचे भांडण ठेवून अनेक कर्मचारी रुजू करून घेतले. ज्या अधिकाऱ्यांनी हा सर्व खटाटोप केला, त्यांची कसून चाैकशी झाल्यास एसटीतील मोठा नोकरभरती घोटाळा उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.