अमरावतीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात रुट मार्च; पोलीस उपायुक्त विनिता साहू यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 10:05 PM2021-11-13T22:05:30+5:302021-11-13T22:06:06+5:30
Nagpur News राज्यात अमरावतीसह ठिकठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर, उपराजधानीत शांतता राखण्यासाठी परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या परिसरात रुट मार्च काढण्यात आला.
नागपूर : राज्यात अमरावतीसह ठिकठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर, उपराजधानीत शांतता राखण्यासाठी परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या परिसरात रुट मार्च काढण्यात आला. पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी या रुट मार्चचे नेतृत्व केले.
निषेध आणि निवेदनाच्या नावाखाली राज्यात ठिकठिकाणी रॅली काढल्या. त्यातील काही समाजकंटकांनी नांदेड, मालेगाव, अमरावतीसह काही ठिकाणी तोडफोड केली. नागपुरात अशी कोणतीच विपरीत घटना घडू नये यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे यांनी प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, झोन २ च्या पोलीस उपायुक्त विनिता साहु यांच्या नेतृत्वात सदरच्या मेश्राम पुतळा चौक येथून शनिवारी सायंकाळी पोलिसांनी रुट मार्च काढला. यावेळी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी १ सहायक पोलीस आयुक्त, सीताबर्डी, सदर, धंतोली, मानकापूर, अंबाझरी आदी ठिकाणचे ७ निरीक्षक, १८ अधिकारी, ६० पोलीस अंमलदार अणि दंगा नियंत्रण पथक, शिघ्र कृती दल, वाहतूक विभाग फ्लॅग मार्च घेऊन रुट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
---