मेट्रो रेल्वेचा मार्ग बदलला
By admin | Published: May 8, 2016 03:04 AM2016-05-08T03:04:16+5:302016-05-08T03:04:16+5:30
मेट्रो रेल्वेने जुना मार्ग आता बदलला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार काँग्रेसनगर चौकातून रहाटे कॉलनी चौकाकडे धावणारी रेल्वे ...
अजनी स्टेशनमार्गे अजनी चौक : विकास आराखड्यानुसार रस्ता तयार होणार
नागपूर : मेट्रो रेल्वेने जुना मार्ग आता बदलला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार काँग्रेसनगर चौकातून रहाटे कॉलनी चौकाकडे धावणारी रेल्वे आता काँग्रेसनगर चौकातून अजनी स्टेशनमार्गे मेडिकल क्वॉर्टर व कारागृह परिसरातून अजनी चौकात नियोजित उड्डाण पुलाला जोडली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मार्ग बदलाची मागणी केल्यानंतर विकास कामांना वेग आला आहे. विकास आराखड्यानुसार या मार्गावर कारागृह परिसरातून अजनी चौकाला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम मनपा करणार आहे, तर त्याचवेळी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसी) पीलर उभारणार आहे. काँग्रेसनगर चौक ते रहाटे कॉलनी चौकापर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे या मार्गावरून मेट्रो रेल्वे नेणे तसे कठीणच होते. नवीन मार्गामुळे बांधकाम वेगात आणि सोईचे राहील, अशी माहिती एनएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी लोकमतशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
जुन्या रस्त्यावरून मेट्रो नेण्यास विरोध
काँग्रेसनगर चौक ते रहाटे कॉलनी चौक या मार्गावर न्यू इंग्लिश स्कूल, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, होमगार्ड कार्यालय आणि रामकृष्ण मिशन आहे. या मार्गावरून मेट्रो नेण्यासाठी कार्यालये आणि येथील रहिवाशांचा कायमच विरोध होता. नवीन रस्त्याच्या निर्मितीसंदर्भात तीन दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली. विकास आराखड्यांतर्गत कारागृहाच्या परिसरातून रस्ता बांधण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. या नवीन बदलांमुळे त्यामुळे काँग्रेसनगर चौकातून थेट अजनी चौकात तयार होणाऱ्या उड्डाण पुलापर्यंत वचौकापर्यंत मेट्रो रेल्वे सहजरीत्या नेणे शक्य होईल. या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषण कुमार उपाध्याय, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोसाठी रस्त्याचे बांधकाम करण्याचे निर्देश एनएमआरसीएल आणि मनपाला दिल्याची माहिती आहे. सध्या अजनी रेल्वे स्टेशन मेट्रो रेल्वेपासून ४०० मीटर लांब आहे. नवीन आराखड्यानुसार तयार होणार रस्ता मेट्रोशी जुळणार आहे. मनपा आणि एनएमआरसीएल संयुक्तरीत्या मेट्रो रेल्वेसाठी पीलर आणि रस्त्याचे बांधकाम करणार आहे.