धाबे, रेस्टाॅरंट, लाॅनवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:26+5:302021-02-26T04:11:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : काेराेना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध धाबे, रेस्टाॅरंट, मंगल कार्यालये, सभागृह व लाॅनला लक्ष्य केले ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : काेराेना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध धाबे, रेस्टाॅरंट, मंगल कार्यालये, सभागृह व लाॅनला लक्ष्य केले आहे. महसूल, पंचायत व पाेलीस विभाग व सावनेर नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (दि. २५) सायंकाळपर्यंत एकूण ११ ठिकाणी धाडी टाकून दंडात्मक कारवाई केली. यात एकूण ३६ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली असून, ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने काही उपाययाेजनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. मात्र, काही नागरिक या प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करीत नसल्याने नागरिकांचा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे सावनेर तालुक्यात महसूल, पंचायत, पाेलीस विभाग व नगरपालिका कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले असून, या पथकांद्वारे बाजारपेठ व व्यापारी प्रतिष्ठानांसाेबतच धाबे, रेस्टाॅरंट, मंगल कार्यालये, सभागृह व लाॅनची पाहणी केली जात आहे.
या पथकाने सावनेर तालुक्यातील ११ विविध ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३६ हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. यात सावनेर शहरातील अंबिका रेस्टॉरंटमध्ये एक हजार रुपये, रिलॅक्स बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये दाेन हजार रुपये, लष्करशहा फॅमिली रेस्टॉरंट एक हजार रुपये, जनता लॉन एक हजार रुपये, महाजन लॉन ७,५०० रुपये, जिम ५०० रुपये, बिर्याणी सेंटर ५०० रुपये तालुक्यातील भानेगाव येथे तीन हजार रुपये, पोटा-चनकापूर येथे सहा हजार रुपये, चिचोली (खापरखेडा) येथे १२ हजार रुपये व दहेगाव (रंगारी) येथे दाेन हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अनिल नागणे यांनी दिली.
ही कारवाई खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या नेतृत्वात सावनेर नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी दिनेश बुधे, नायब तहसीलदार गजानन जवादे, नाझर जयसिंग राठोड, मधुकर लोही, नीलेश नकाशे, जितू जीवतोडे, सूरज धोके यांच्या पथकाने केली.