नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात वाकाटक राजवंशाची राजमुद्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 10:54 AM2020-11-21T10:54:41+5:302020-11-21T10:57:00+5:30
Central Museum Nagpur News हजारो वर्षांपूर्वी या पृथ्वीवर घडून गेलेला इतिहास हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमधून त्या काळातील अस्तित्वाचे दर्शन घडवित असतो. अशीच एक वस्तू मध्यवर्ती संग्रहालयाच्या संग्रही नव्याने दाखल झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजारो वर्षांपूर्वी या पृथ्वीवर घडून गेलेला इतिहास हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीमधून त्या काळातील अस्तित्वाचे दर्शन घडवित असतो. अशीच एक वस्तू मध्यवर्ती संग्रहालयाच्या संग्रही नव्याने दाखल झाली आहे जी १५०० वर्षापूर्वी घडून गेलेल्या इतिहासाचे दर्शन घडविते. ही इ.स. पाचव्या शतकातील राजमुद्रा आहे जी वाकाटक राजवंशाची साक्ष देते.
हा इसवी सन ५ व्या शतकात वाकाटक नरेश प्रिथिवीसेन द्वितीय यांनी तयार केलेला ताम्रपट आहे. या ताम्रपटावर ब्राह्मी लिपी आणि संस्कृत भाषेत वाकाटक राजवटीतील राजांची नावे काेरली आहेत. ताम्रपटाच्या वर लक्ष्मी देवीची प्रतिकृती काेरलेली आहे. त्याखाली नरेंद्रसेन सत्सुनाे, मर्त्तुर्वाकाटक श्रिय, प्रिथिवीसेन नृपते आणि जिगीषाेर्ज्जय शासन अशा चार राजवटींचा उल्लेख आढळून येताे.
मध्यवर्ती संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक विनायक निट्टूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्याच्या गाेजाेली या गावी प्रकाश उराडे नामक व्यक्तीच्या घरी राजमुद्रा आढळल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यावेळी अभिरक्षक जया वाहाने यांच्या मार्गदर्शनात उराडे यांच्याशी संपर्क साधला आणि ती प्राप्त करण्यात यश आले. ३० जुलै राेजी ही राजमुद्रा मध्यवर्ती संग्रहालयात आणण्यात आली. ब्राह्मी लिपीत असल्याने केंद्रीय पुरातत्त्व विभाग, म्हैसूर यांच्याकडून कायदेशीर परवानगी घेऊन लिपी वाचन व लिप्यांतर करून भाषांतरित राजमुद्रा संग्रहालयाच्या प्रदर्शनात लावण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या काेराेना संसर्गाचा धाेका लक्षात घेता संग्रहालय बंद आहे. त्यामुळे ही राजमुद्रा किंवा एकूणच संग्रहालय सामान्य नागरिक व अभ्यासकांना पाहता येणार नाही. मात्र जेव्हा कधी संग्रहालय खुले हाेईल, तेव्हा या वाकाटक राजवटीच्या राजमुद्रेचे अवलाेकन करता येईल.
- विनायक निट्टूरकर,
सहायक अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय