एकाच दिवशी पाच भामट्यांच्या आरपीएफने बांधल्या मुसक्या; ईतवारी स्थानकावर तिघांना तर गोंदियात दोघांना अटक
By नरेश डोंगरे | Published: May 9, 2024 08:43 PM2024-05-09T20:43:12+5:302024-05-09T20:47:30+5:30
अटकेतील चोरटे रेल्वे प्रवाशांचे सामान चोरत होते.
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) इतवारी आणि राजनांदगावमधील विभागीय विशेष पथकाने गुरुवारी एकाच दिवशी पाच सराईत भामट्यांच्या मुसक्या बांधल्या. तिघांना ईतवारी स्थानकावर, एकाला रेल्वेत तर दुसऱ्या एकाला गोंदिया स्थानकावर पकडण्यात आले. अटकेतील चोरटे रेल्वे प्रवाशांचे सामान चोरत होते.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, येथील नेताजी सुभाषचंद्र बोस, इतवारी रेल्वे स्थानकावर आज दुपारी आरपीएफचे पथक गस्त करीत असताना प्रवाशांच्या बॅग हुडकताना तीन भामटे नजरेस पडले. त्यांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता ते गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगमधून माैल्यवान चिजवस्तू लंपास करणारे सराईत चोरटे असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चाैकशीनंतर त्यांना रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. रेल्वे पोलीस आता त्यांची चाैकशी करीत आहेत.
ट्रेन नंबर १२१३० दुर्ग गोंदिया दरम्यान आरपीफच्या पथकाला एका सतर्क प्रवाशाने एका भामट्याची माहिती दिली. तो धावत्या गाडीत प्रवाशांच्या बॅग तपासत असल्याचे आपण पाहिल्याचेही प्रवाशाने सांगितले. त्यावरून कोच नंबर एस-७ मध्ये आरपीएफच्या पथकाने तपासणी केली असता बाथरूमजवळ एकांश संतोष त्रीपाठी (वय २५, रा. रायपूर) हा भामटा संशयास्पद अवस्थेत आढळला. त्याच्याकडे एक टॅब आढळला. आरपीएफ पथकाने रायपूर रेल्वे पोलिसांकडे चाैकशी केली असता दोन दिवसांपूर्वी आमच्याकडे अनेक चोऱ्या झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आरपीएफने त्रिपाठीला रायपूर रेल्वे पोलिसांच्या हवाली केले.
अशाच प्रकारे गोंदिया रेल्वे स्थानकावर दिनेश मनोहर सूर्यवंशी हा चोरटा आरपीएफच्या हाती लागला. तो बालाघाट मलाजखंड येथील रहिवासी आहे. गोंदियाच्याच रेल्वे स्थानकावर चोरीला गेलेला एक मोबाईलही सापडला. विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे निरीक्षक प्रशांत अल्दक, एस. ए. राव. उपनिरीक्षक विवेक मेश्राम, एएसआय के. के. निकोडे, कर्मचारी संतोष सिंह, सोनू सिंह, आर. पी. घागरे, रवी दुबे आणि अकबर खान यांनी ही कामगिरी बजावली.