आरपीएफने प्रवाशांसोबत साजरी केली दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 01:25 AM2018-11-09T01:25:20+5:302018-11-09T01:25:51+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी लक्ष्मीपूजनानिमित्त प्रवाशांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रवासातील लहान मुलांना फुगे वाटण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वधर्म समभावाचा संदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी लक्ष्मीपूजनानिमित्त प्रवाशांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रवासातील लहान मुलांना फुगे वाटण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सर्वधर्म समभावाचा संदेश दिला.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या संकल्पनेतून बुधवारी लक्ष्मीपूजनानिमित्त दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी आरपीएफचे पुुरुष, महिला कर्मचाऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. मुख्य प्रवेशद्वारावर मोठी रांगोळी काढण्यात आली. यात नागपुरातून जाणाऱ्या विविध रेल्वेगाड्यातील जनरल, स्लिपर, एसी कोचमधील प्रवाशांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रवासातील लहान मुलांना फुगे वितरीत करण्यात आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. एका लहान दिव्यांग मुलाने ग्रीन फटाक्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ज्योती कुमार सतीजा यांनी त्यास १०० रुपये भेट दिल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहिला. एका ज्येष्ठ प्रवाशाने अशा प्रकारची दिवाळी पहिल्यांदाच रेल्वेत पहावयास मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर रेल्वेस्थानकावरील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांमध्ये मिठाईचे वितरण केले.