Nagpur: अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये आरपीएफने केले ऑपरेशन नार्कोस, बिहारचा गांजा तस्कर जेरबंद
By नरेश डोंगरे | Published: March 23, 2024 09:19 PM2024-03-23T21:19:25+5:302024-03-23T21:19:52+5:30
Nagpur News: रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले.
- नरेश डोंगरे
नागपूर - रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ट्रेन नंबर २०८६१ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये 'ऑपरेशन नार्कोस' राबवून १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी गांजाची तस्करी करणाऱ्या बिहारमधील एका आरोपीलाही आरपीएफने ताब्यात घेतले. राजेशकुमार कृष्णदेव मंडल (वय ३६) असे अटकेतील गांजा तस्कराचे नाव असून तो भागलपूर (बिहार) जिल्ह्यातील नारायणपूरचा रहिवासी आहे.
सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे पथक पूरी-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये ऑपरेशन नार्कोस अंतर्गत झाडाझडती घेत होते. ही गाडी शुक्रवारी भंडारा स्थानकावरून नागपूरकडे निघाल्यानंतर जनरल डब्यात एक व्यक्ती संशयास्पद वर्तन करीत असल्याचे आरपीएफच्या जवानांना जाणवले. त्यामुळे आरपीएफने त्याच्या सीटखाली तपासणी केली असता दोन बॅग आढळल्या. त्या बाहेर काढल्या असता बॅगमधून उग्र दर्प आला. त्यामुळे आरपीएफच्या पथकाने पंचासमक्ष त्या उघडल्या असता त्यात गांजाचे पॅकेट आढळले. आरोपी राजेश या गांजाचे पार्सल असलेल्या बॅग घेऊन पूरी येथून रेल्वेत बसला होता. तो जळगावला जाणार असल्याचे त्याच्या जवळ आढळलेल्या तिकिटमधून स्पष्ट झाले. त्यामुळे नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकावर गाडी येताच आरोपीला खाली उतरवून त्याची कसून चाैकशी करण्यात आली. तो गांजाची खेप जळगावला पोहचवणार होता, हे स्पष्ट होताच शुक्रवारी सायंकाळी त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले. कागदोपत्री कारवाई करून आरोपी राजेश मंडलला रेल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.
आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय एस. ए. राव, एएसआय अजय चाैबे, के. के. निकोड, कर्मचारी जी. आर. मडावी, व्ही. एस. पटले, डी. एन. यादव तसेच सुधाकर बोरकर यांनी ही कारवाई केली.
लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब
विशेष म्हणजे, लोकमतने शनिवारच्या अंकात रेल्वेतून गांजा, दारू, भांगेसह अंमली पदार्थाची मोठी तस्करी होत असल्याचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. या कारवाईमुळे पुन्हा एकदा लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २,०४,३२० रुपये आहे. अशा प्रकारे कुणी अंमली पदार्थांची वाहतूक करीत असेल तर तातडीने आरपीएफ किंवा जीआरपीला किंवा हेल्पलाइन नंबर १३९ वर कॉल करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.