रेल्वे रोको आंदोलनामुळे ‘आरपीएफ’, ‘जीआरपी’ सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:13 AM2021-02-18T04:13:28+5:302021-02-18T04:13:28+5:30
नागपूर : केंद्र शासनाने तयार केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी गुरुवारी दुपारी १२ ते ४ दरम्यान ...
नागपूर : केंद्र शासनाने तयार केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी गुरुवारी दुपारी १२ ते ४ दरम्यान देशव्यापी रेल्वे रोको आंदोलनाचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागपुरात रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस सतर्क झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी सीताबर्डी, अजनी, इतवारीसह शहरातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर बुधवारी सायंकाळपासून बंदोबस्त तैनात केला आहे. मनिषनगर रेल्वे क्रॉसिंगपासून नरेंद्रनगर पुल, अजनी रेल्वेस्थानक, लोहापूल, नागपूर रेल्वेस्थानकाजवळील आऊटर, गुरुद्वारा, मंगळवारी आरओबी, कोराडी रोड क्रॉसिंगसह गोधनी पर्यंत देखरेख करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील कळमेश्वर, काटोल, नरखेड, पांढुर्णा, तिगाव, मुलताई, वरुड या रेल्वेस्थानकावर अतिरिक्त आरपीएफ जवानांना तैनात करण्यात आले असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी दिली.
..............
रेल्वे अॅक्टनुसार होणार गुन्हा दाखल
रेल्वे रोको आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. शहरात लोहमार्ग पोलिसांसोबत शहर पोलिसही मदत करणार आहेत. यापूर्वीही रेल्वे रोको करणाºया आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
..........