आरपीएफ जवानांनी जबाबदारीने कार्य करावे
By admin | Published: September 24, 2016 01:26 AM2016-09-24T01:26:10+5:302016-09-24T01:26:10+5:30
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाने मागील वर्षभरात पार पाडलेली कामगिरी कौतुकास्पद असून
बृजेश कुमार गुप्ता : आरपीएफचा ३२ वा स्थापना दिन उत्साहात
नागपूर : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाने मागील वर्षभरात पार पाडलेली कामगिरी कौतुकास्पद असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी केले.
अजनी येथील आरपीएफ परेड मैदानात आरपीएफच्या ३२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, सिनिअर डीसीएम कुश किशोर मिश्र, आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, भगवान इप्पर, लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर उपस्थित होते. ‘डीआरएम’ गुप्ता यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या एकंदर कामकाजावर समाधान व्यक्त करून त्यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी वर्षभरात आरपीएफने पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. समारंभात ‘डीआरएम’ गुप्ता यांच्या हस्ते बेस्ट परफॉर्मन्स आणि रेल्वे अॅक्ट केसेससाठी नागपूर ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना पदक देऊन गौरविण्यात आले तर बेस्ट क्राईम कंट्रोलसाठी चंद्रपूर ठाण्याचे निरीक्षक एस. एस. ठाकूर, बेस्ट इन्व्हेस्टिगेशन शिल्ड वर्धाचे निरीक्षक सुरेश कांबळे यांना देण्यात आले. ‘डीआरएम’ गुप्ता यांनी परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली.
परेडचे नेतृत्व महिला आरक्षक प्रिस्मा शर्मा यांनी केले. पहिल्या प्लाटूनचे नेतृत्व किरण नगराळे, दुसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व स्वाती शिंदे, तिसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व ज्योती दीक्षित आणि श्वान पथक प्लाटूनचे नेतृत्व अश्विनी मुळतकर यांनी केले. परेडनंतर श्वान पथकाच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आरपीएफचे अधिकारी, जवान, महिला आरक्षकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. (प्रतिनिधी)