चोरट्यांच्या विरोधात आरपीएफने केली दुरसंचारसोबत हातमिळवणी

By नरेश डोंगरे | Updated: April 4, 2025 16:15 IST2025-04-04T16:14:29+5:302025-04-04T16:15:07+5:30

मोबाईल चोरीचा झटपट लागेल छडा : सीईआयआर पोर्टल, पायलट प्रोजेक्ट यशस्वी

RPF joins hands with telecom to fight thieves | चोरट्यांच्या विरोधात आरपीएफने केली दुरसंचारसोबत हातमिळवणी

RPF joins hands with telecom to fight thieves

नरेश डोंगरे - नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
प्रवाशांचे मोबाईल चोरून पळ काढणाऱ्या चोरट्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आता जोरदार आघाडी उघडली आहे. आरपीएफने मोबाईल चोरट्यांना जेरबंद करून चोरी गेलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी दूरसंचार विभागाशी हातमिळवणी (करार) केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे चोरी गेलेले मोबाईल लवकर परत मिळवणे सोपे होणार आहे.

रेल्वे स्थानक अथवा विविध रेल्वे गाड्यांमधील गाफिल प्रवाशाचे मोबाईल लंपास करून चोरटे पळून जातात. या चोरीची तक्रार दाखल होईपर्यंत चोरटे कुठल्या कुठे निघून जातात. त्यामुळे चोरी गेलेला मोबाईल परत मिळवणे कठीण होते. मात्र, आता आरपीएफने दूरसंचार विभागाच्या सीईआयआर पोर्टलची साथ मिळवून चोरीला गेलेले मोबाईल परत मिळवण्यासाठी जोरदार आघाडी उघडली आहे.

विशेष म्हणजे, आरपीएफने नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर रेल्वेत अशा प्रकारचा एक पायलट प्रोजेक्ट मे २०२४ मध्ये सुरू केला होता. त्याला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. चोरी गेलेले हजारो फोन आरपीएफच्या हाती लागले. हे फोन लंपास करणारे चोरटेही मिळाले. त्यामुळे आरपीएफने आता हा प्रयोग देशभर सुरू करण्याचे ठरवले आहे.

काय आहे सीईआयआर ?
दूरसंचार विभागाचे हे पोर्टल एक डिजिटल प्लेटफार्म आहे. चोरीला गेलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ब्लॉक करण्याची, ट्रॅक करण्याची आणि प्रतिबंधित करण्याची सुविधा यातून मिळते. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांचे चोरी गेलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल आधी शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. ते मिळत नसल्यास मोबाईलचा आयएमईआय नंबर ब्लॉक केला जाईल. अर्थात तो मोबाईल चोरटा किंवा दुसरा कुणी व्यक्ती वापरू शकणार नाही. दुसरीकडे मोबाईल धारक वारंवार प्रयत्न करेल आणि ट्रेकिंगच्या माध्यमातून हा मोबाईल परत मिळवणे सहज शक्य होईल.

नवीन सीम टाकून मोबाईल सुरू केला तर...
चोरीला गेलेला मोबाईल परत मिळवण्यासाठी प्रवासी मोबाईलची तक्रार रेल मदत या पोर्टलवर किंवा रेल्वे हेल्पलाईन नंबर १३९ वर करू शकतात. त्यांना एफआयआर दाखल करण्याची ईच्छा नसेल तर ते सीईआयआर पोर्टवरही तक्रार देऊ शकतात. येथे नोंदणी झाल्यानंतर आरपीएफच्या झोनल सायबर सेलमध्ये ती तक्रार नोंदली जाईल. त्यानंतर आवश्यक विवरण नोंदवून घेतल्यानंतर मोबाईलचे सीम ब्लॉक केले जाईल. चोरटा किंवा त्याच्या साथीदाराने नवीन सीम टाकून मोबाईल सुरू केला तर संबंधित व्यक्तीला आरपीएफकडून फोन करून तो मोबाईल तात्काळ जवळच्या आरपीएफ चाैकीत जमा करण्याचे आदेश दिले जातील. त्याने प्रतिसाद दिला नाही तर गुन्हा दाखल केला जाईल.

Web Title: RPF joins hands with telecom to fight thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.