आरपीएफ जवानांनी जोशात केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:00+5:302021-07-10T04:07:00+5:30
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या मोतीबाग परिसरात दिल्ली शॉपमध्ये आरपीएफच्या नवनिर्मित लेडीज बॅरेकमध्ये शुक्रवारी सकाळी १०.३० ...
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या मोतीबाग परिसरात दिल्ली शॉपमध्ये आरपीएफच्या नवनिर्मित लेडीज बॅरेकमध्ये शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपासून रक्तदान शिबिराचे आयोजन झाले. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या सुरक्षा बलाद्वारे आयोजित या कार्यक्रमात जवानांनी उत्साहात रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.
शिबिराचे उद्घाटन मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या हस्ते झाले. यावेळी निरीक्षक सेटलमेंट राजीव कुमार, उपनिरीक्षक कामठी मोहम्मद मुगीसुद्दीन व एस. के. सिंह उपस्थित होते. जीएसके ब्लड सेंटरच्या सहयोगाने शिबिराचे आयोजन झाले. यावेळी जीएसकेचे डॉ. आशिष खंडेलवाल, श्वेता खंडेलवालसह त्यांच्या टीममधील रिजवाना शेख, सायली नक्षीने, शुभांगी बंसोड, अश्विनी खेकारे, रितेश सुरपब व प्रेम व्यास उपस्थित होते.
रक्त कृत्रिमरीत्या तयार केले जाऊ शकत नाही. रक्ताची गरज पडल्यास एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या मदतीसाठी धावू शकतो. वर्तमानात रक्त संकलनाची मोठी गरज आहे. अशा स्थितीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला हा उपक्रम म्हणजे मानवतेच्या सेवेसाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. रक्तदान विनाआर्थिक मदतीचे सर्वोत्तम दान असल्याची भावना डॉ. आशिष खंडेलवाल यांनी यावेळी व्यक्त केली.
----------------
मानवतेसाठी सर्वोत्तम प्रयत्न - पंकज चुघ
नव्या बॅरेकमध्ये आयोजित हा पहिलाच कार्यक्रम असून, मानवतेच्या संरक्षणार्थ अशा सर्वोत्तम उपक्रमांची गरज असल्याची भावना आरपीएफ नागपूर मंडळाचे सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांनी व्यक्त केली. गेले काही महिने सर्वांसाठीच दु:खदायी होते. रक्ताचा प्रचंड तुटवडा होता. ही स्थिती बघता, आपण आतापासूनच तयार असलो तरी भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यास सोपे जाईल. कोरोना काळात देशाच्या चौथ्या स्तंभाने जबाबदारीने काम केले. लोकमतच्या माध्यमातून ‘रक्ताचं नातं’ हे अभियान विविध संस्था व नागरिकांना जोडणारे एक महाअभियान कौतुकास्पद असल्याचे पंकज चुघ म्हणाले.