प्रोफेसर कॉलनीत आरपीएफचा छापा
By नरेश डोंगरे | Published: May 15, 2023 03:16 PM2023-05-15T15:16:57+5:302023-05-15T15:19:35+5:30
बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वे तिकिटांची बुकिंग : काळाबाजारीचा पर्दाफाश : ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त
नरेश डोंगरे, नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वे तिकिटांची बुकिंग करणाऱ्या आणि या तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या प्रोफेसर कॉलनीतील एका केंद्रात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छापा घातला. या छाप्यात आरपीएफला दोन लॅपटॉप, मोबाईल तसेच ३७ लाईव्ह तिकिटांसह ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळाला. या प्रकरणी आरोपी प्रवीण झाडे याला आरपीएफने ताब्यात घेतले आहे.
देशाच्या सर्वच भागात नागपुरातून रेल्वेगाड्या जातात. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर ठिकठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची वर्षभर गर्दी राहते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रेल्वेस्थानकावरील गर्दीत मोठी भर पडली आहे. बहुतांश प्रवासी लांब पल्ल्याच्या अंतरावर प्रवास करणारे असतात आणि उगाच कुटुंबातील व्यक्तींना त्रास नको म्हणून प्रत्येक जण रेल्वे तिकिटांचे रिझर्वेशन करण्याला प्राधान्य देतो. मात्र, ऐनवेळी आकस्मिक काम आल्याने अशावेळी रिझर्वेशन मिळत नाही. त्यामुळे बहुतांश जण दलालांकडे धाव घेतात. दलालांचे साटेलोटे असल्याने एका तिकिटावर पाचशे ते सातशे रुपये जास्त मोजल्यास आरामात कुठलेही रिझर्वेशन मिळते.
अशात आयआरसीटीसी तर्फे रेल्वे तिकिटांचे बुकिंग करण्याचा अधिकृत परवाना मिळणाऱ्या काही एजंटस् नी रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारीतून रोज लाखो रुपये कमविण्यासाठी भलतीच शक्कल लढविली आहे. दलालांना हाताशी धरून त्यांनी बनावट सॉफ्टवेअरचा गैरवापर करून एकाच वेळी अनेक ठिकाणच्या तात्काळ रिझर्वेशनच्या तिकिटा मिळविण्याची शक्कल लढविली आहे. आरोपी झाडे अशाच प्रकारे तिकिटे मिळवून विकत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. त्याआधारे शनिवारी आरपीएफने झाडेच्या प्रोफसर कॉलनीतील घरी छापा घालून झाडाझडती घेतली. यावेळी आरपीएफला तिकिटांसह ८३ लाखांचे साहित्य हाती लागल्याचे समजते.
पाच वर्षांपासून गोरखधंदा
आरपीएफचे सिनियर कमांडंट आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शनिवारपासून सुरू असलेली कारवाई अजूनही सुरूच असून, आरोपी झाडे हा गोरखधंदा पाच वर्षांपासून करत होता, असा संशय आरपीएफला आहे. रात्रीपर्यंत कारवाईबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होईल, असे संकेत आरपीएफच्या सूत्रांनी दिले.