सेवाग्राम आणि बडनेरातील अट्टल चोरट्यांना आरपीएफने ठोकल्या बेड्या
By नरेश डोंगरे | Published: March 14, 2024 09:12 PM2024-03-14T21:12:30+5:302024-03-14T21:12:50+5:30
चोरीच्या गुन्ह्यांची कबुली : दोघांकडूनही रोख रक्कम जप्त
नागपूर: रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. यातील एक भामटा सेवाग्राम (वर्धा) येथील असून दुसरा बडनेरा (अमरावती) येथील रहिवासी आहे.
आरपीएफचे जवान रेल्वेगाड्या येता-जाताना प्लेटफॉर्मवर प्रत्यक्ष आणि सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवून असतात. अशाच प्रकारे ट्रेन नंबर १२८३३ हावडा सुपरफास्ट ट्रेन नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर आली असताना त्यातून दोन व्यक्ती संशयास्पदरित्या खाली उतरताना दिसले. ते पाहून कर्तव्यावर असलेले आरपीएफचे उपनिरीक्षक एच. एल. मिना, सीताराम जाट, हवलदार कपिल झरबडे, कुंदन फुटाणे, निरज कुमार, रवींद्र कुमार आणि विना सोरेन तसेच जीआरपीचे सुशील वासनिक आणि सतीश बुरडे यांनी या दोघांना शिताफिने पकडले. पोलीस ठाण्यात या दोघांची पीएसआय सुभाष मडावी आणि ठाणेदार आर. एल. मिना यांनी वेगवेगळी विचारपूस केली असता एकाने त्याचे नाव अजय सूर्यभान भगत (वय५०, रा. आदर्शनगर, सेवाग्राम, जि. वर्धा) आणि दुसऱ्याने अविनाश सुभाष चाैधरी (वय ३६, रा. अशोकनगर, नवीन वस्ती, बडनेरा, जि. अमरावती) सांगितले. ९ मार्चला रेल्वे स्थानकवरच्या कॅनरा बँकेच्या एटीएमजवळ झोपून असलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोठी रोकड चोरल्याची कबुली दिली. त्यातील २२७० रुपयेही त्याने आरपीएफच्या हवाली केले.
अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यता
दुसरा चोरटा चाैधरी याने २ मार्चला हावडा सुपरफास्ट ट्रेन मधून एका व्यक्तीची रोकड लांबविल्याची कबुली दिली. त्याने या चोरीतील ५२५० रुपये आरपीएफच्या हवाली केले. या दोघांनाही नंतर आरपीएफने रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. त्यांच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, रेल्वे पोलीस त्यांची चाैकशी करीत आहेत.