प्लॅटफॉर्मवर चोरी करणाऱ्या छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफने ठोकल्या बेड्या
By नरेश डोंगरे | Published: March 9, 2024 01:49 PM2024-03-09T13:49:30+5:302024-03-09T13:49:44+5:30
रेल्वे स्थानकावर गर्दीत हात चलाखी करणाऱ्या आरोपींची संख्या सारखी वाढतच आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे हातचलाखी दाखवणाऱ्या एका छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफच्या जवानांनी बेड्या ठोकल्या.
नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वे स्थानकावर गर्दीत हात चलाखी करणाऱ्या आरोपींची संख्या सारखी वाढतच आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे हातचलाखी दाखवणाऱ्या एका छिंदवाड्यातील आरोपीला आरपीएफच्या जवानांनी बेड्या ठोकल्या.
कलीराम मनकु मसराम (वय ४०) असे या भामट्याचे नाव असून तो छिंदवाडा जिल्ह्यातील पतलून, चौरई येथील रहिवासी आहे.
मंगलगाव, चिमूर येथील रहिवासी मुकेश सुरेश खेडकर (वय २७) शुक्रवारी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर उभे असताना तेथे झालेल्या गर्दीचा गैरफायदा उठवत आरोपी कलीराम यांनी मुकेशच्या खिशातील पैशाचे पाकीट लांबविले. ते लक्षात आल्यानंतर अडीच हजार रुपये, आधारकार्ड आणि महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेल्याची तक्रार मुकेशने रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवली. रेल्वे पोलिसांकडून ही माहिती आरपीएफला देण्यात आली आणि आरोपीची चौकशी सुरू करण्यात आली.
फलाट क्रमांक ८ वरील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून आरपीएफ चे पीएसआय सिताराम जाट, हवालदार कपिल
झरबडे तसेच आरक्षक देवेंद्र पाटील यांनी परिसरात पाहणी सुरू केली. सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांना मुंबई रेल्वे लाईनच्या टोकावर आरोपी कलीराम संशयास्पद अवस्थेत दिसला. त्यांनी त्याला तब्येत घेऊन आरपीएफ च्या ठाण्यात आणले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मुकेश यांचे पाकीट, आधार कार्ड आणि फोटो आढळले. पोलीस निरीक्षक मीना यांनी आरोपीकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे मुकेशला बोलवून ते पाकीट रक्कम आणि त्यातील आधार कार्ड व फोटो त्याचेच आहे का, याची शहानिशा करण्यात आली. मुकेशने संशयित आरोपीचा चेहरा ओळखला. त्यानंतर कलीराम जवळचा मुद्देमाल जप्त करून त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
परप्रांतीय भामट्यांचा सुळसुळाट
नागपूर रेल्वे स्थानकावर २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. खास करून गाडीत चढताना किंवा उतरताना प्रवाशांची मोठी गर्दी होते. ती संधी साधून त्यांच्या जवळची रक्कम, दागिने किंवा मोबाईल सारख्याच वस्तू लंपास करण्यासाठी नागपुरात मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि अन्य प्रांतातील गुन्हेगार तसेच नागपूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील भामटे रेल्वे स्थानक आणि परिसरात घुटमळत असतात. अलीकडे अशा भामट्यांचा सुळसुळाट झाल्याचे वारंवार होणाऱ्या घटनेतून उघडकीस येत आहे.