आरपीएफने गुन्हेगारात वचक निर्माण करावा : त्रिलोक कोठारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 07:33 PM2018-09-26T19:33:19+5:302018-09-26T19:34:09+5:30
रेल्वे सुरक्षा दलाची प्रवाशांच्या सुरक्षिततेची कामगिरी मोलाची असून सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी सांभाळत असताना आरपीएफने गुन्हेगारात आपला वचक निर्माण करावा, असे प्रतिपादन अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाची प्रवाशांच्या सुरक्षिततेची कामगिरी मोलाची असून सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी सांभाळत असताना आरपीएफने गुन्हेगारात आपला वचक निर्माण करावा, असे प्रतिपादन अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी यांनी केले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या ३४ व्या स्थापना दिनानिमित्त अजनी परेड मैदानावर आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. कार्यक्रमाला रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, लोहमार्ग पोलीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे उपस्थित होते. कोठारी म्हणाले, आरपीएफने असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करून प्रवाशांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली आहे. रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून प्रवाशांचे महागडे साहित्य परत करण्यात येत आहे. मागील ४५० दिवसात रेल्वेस्थानकाला व्हेंडरमुक्त करण्यात आले आहे. १८२ हेल्पलाईन अपग्रेड झाल्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे. यावेळी कमांडंट सतीजा म्हणाले, आरपीएफने वर्षभरात आठ वेळा गांजाची तस्करी पकडून चार आरोपींना अटक केली. दारूची तस्करी करणाऱ्या ७२ जणांना अटक करून ३६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रेल्वे संपत्तीची चोरी करणाºयांकडून ५२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. २४ रेल्वेगाड्यात स्कॉटिंग करण्यात येत असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. स्थापना दिनाच्या परेडचे नेतृत्व आरपीएफच्या उपनिरीक्षक शिवानी बिधुरी, आमलाच्या उपनिरीक्षक गोपिका मानकर, अनुराधा मेश्राम, किरण पाठक, सुशिला अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमात श्वान रेक्स, जॉन यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी प्रमुख पाहुणे, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना वृक्ष भेट देऊन त्यांचे स्वागत केले. संचालन नेताजी शेंडे यांनी केले. आभार ए.सी. सिन्हा यांनी मानले. कार्यक्रमाला आरपीएफ नागपूर ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, दिनेश कुमार मिश्रा, सुरेश कांबळे, रामगोपाल निपसैया, बद्रिप्रसाद यादव, सुरेंद्र कुमार कोश्टा यांच्यासह रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.