आरपीएफ जवानांची मेस होणार ‘मॉडर्नाईज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:08 AM2021-01-23T04:08:18+5:302021-01-23T04:08:18+5:30
दयानंद पाईकराव नागपूर : रेल्वे सुरक्षा दलात सध्या अजनी आणि नागपूर येथे दोन मेस आहेत. येथे जवानांसाठी भोजन तयार ...
दयानंद पाईकराव
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलात सध्या अजनी आणि नागपूर येथे दोन मेस आहेत. येथे जवानांसाठी भोजन तयार करण्यात येते; परंतु कोरोनाच्या काळात जवानांना स्वच्छ भोजन मिळावे यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पाऊल उचलले असून या मेसमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे स्वयंपाक तयार करण्याची तयारी करण्यात येत आहे. मशीन मागविण्यासाठी निविदा काढण्यात आली असून फेब्रुवारीअखेरपर्यंत मशीनच्या साह्याने तयार केलेले भोजन आरपीएफच्या जवानांना मिळणार आहे.
रेल्वे सुरक्षा दलात अनेकदा बदली झाल्यानंतर अनेक अधिकारी आणि आरपीएफ जवान आपले कुटुंबीयांना सोबत आणत नाहीत. ते रेल्वे सुरक्षा दलाच्या बॅरेकमध्ये राहतात. तेथे उपलब्ध असलेल्या मेसमधील भोजन करतात. परंतु अनेकदा मेसमधील भोजन तयार करणाऱ्या व्यक्तींकडून स्वच्छतेबाबत हवी तशी काळजी घेण्यात येत नाही. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना स्वच्छ भोजन मिळावे यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार आरपीएफच्या मेसमध्ये भोजन तयार करण्यासाठी अत्याधुनिक मशिन्स मागविण्यात येत आहेत. त्यात कणीक भिजविण्याची मशीन, चपाती तयार करणारी मशीन, राईस मेकर आदी मशीनची समावेश आहे. या मशीनच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या मशीन आरपीएफच्या मेसमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर आरपीएफच्या जवानांना मशीनच्या साह्याने तयार केलेले भोजन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ५.३० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. सध्या आरपीएफच्या अजनी येथील मेसमध्ये ७५ जवान आणि नागपूर रेल्वेस्थानकावरील मेसमध्ये २५ असे एकूण १०० अधिकारी आणि जवान मेसमध्ये भोजन करतात. या मेसमध्ये भोजन तयार करण्यासाठी ६ कर्मचारी कामाला आहेत. मशीन आल्यानंतर दोन कर्मचारीच मेसचा कारभार सांभाळणार आहेत. यामुळे मनुष्यबळाची बचत होण्यासोबतच जवानांना स्वच्छ भोजनही मिळणार आहे.
................
फेब्रुवारीअखेर दाखल होणार मशीन
आरपीएफ जवानांना स्वच्छ भोजन पुरविण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा मेसमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून फेब्रवारीअखेर जवानांना मशीनच्या साह्याने तयार केलेले स्वच्छ भोजन पुरविण्यात येईल.
-आशुतोष पांडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल.