आरपीएफ आणखी सतर्कतेने कार्य करेल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:36+5:302021-09-21T04:08:36+5:30
नागपूर : रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांच्या सुविधेसाठी अविरत परिश्रम घेते. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या तक्रारींची दखल नेहमीच रेल्वे सुरक्षा ...
नागपूर : रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांच्या सुविधेसाठी अविरत परिश्रम घेते. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या तक्रारींची दखल नेहमीच रेल्वे सुरक्षा दलातर्फे घेण्यात येते. यापुढेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दल आणखी सतर्कतेने कार्य करेल, असे आश्वासन रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी केले.
रेल्वे सुरक्षा दलाचा स्थापना दिन अजनीच्या परेड मैदानावर सोमवारी आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डीआरएम रिचा खरे, लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार उपस्थित होते. आशुतोष पांडे म्हणाले, आरपीएफच्या कार्यासाठी २०१८ मध्ये होम मिनिस्टर ट्रॉफी मिळाली आहे. महिला, मुलांची सुटका करण्यासाठी आरपीएफ सतत कार्य करते. रेल्वे तिकीट दलालांचा बंदोबस्त करून दीड वर्षात १०० दलालांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच मादक पदार्थांची तस्करी रोखून ३०० किलो गांजा पकडल्याचे त्यांनी सांगितले. डीआरएम रिचा खरे यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्याचे कौतुक करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असेच प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात भूपेंद्र बाथरी, मुनेश गौतम, नरेश मेश्राम, प्रदीप कहावत, रवींद्र कुमार, शिवम सिंग, उमेश सिंग, जावेद मंसुरी, आर. गडपलवार, एस. के. पवार आदींचा उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. यावेळी बांबू डान्स, केसाने सायकल फिरविणे, केसाने कार ओढणे, डोक्यावर नारळ फोडणे या चित्तथरारक कवायतींनी सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाला नागपूर ठाण्याचे निरीक्षक आर. एल. मीना, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. संचालन सुशील तिवारी यांनी केले. आभार सहायक सुरक्षा आयुक्त कोटा जोजी यांनी मानले.
..........
आरपीएफतर्फे जीआरपीचा सत्कार
रेल्वेमध्ये रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस कार्यरत आहेत. दोन्ही यंत्रणा प्रवाशांच्या हितासाठी कार्य करतात. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून रेल्वे सुरक्षा दलाने लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, नाजनीन पठाण यांचा सत्कार केला. या सत्कारामुळे लोहमार्ग पोलिसांना आपले कर्तव्य अधिक चोखपणे बजावण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
................