आरपीएफचे 'लाख मोलाचे' ऑपरेशन अमानत; प्रवाशांना दिलासा, रोकड अन् दागिन्यांसह ९ लाखांचा ऐवज परत केला
By नरेश डोंगरे | Published: February 17, 2024 08:48 PM2024-02-17T20:48:00+5:302024-02-17T20:48:55+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. 'ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन अमानत'चाही त्यात समावेश आहे.
नागपूर : रेल्वेची संपत्ती तसेच प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) 'ऑपरेशन अमानत' अंतर्गत तत्परतेचा परिचय देऊन अवघ्या १० दिवसांत दोन प्रवाशांची रोकड आणि माैल्यवान चिजवस्तूंसह ९ लाखांचे साहित्य परत केले.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे क्षेत्रिय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे आरपीएफ वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशांच्या हिताचे उपक्रम राबवित असते. 'ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन अमानत'चाही त्यात समावेश आहे. वेगवेगळ्या कारणामुळे घरून पळून जाणाऱ्या, कुणी पळवून नेणाऱ्या किंवा अनवधानाने हरविलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्याची महत्वपूर्ण कामगिरी 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत बजावली जाते. तर, 'ऑपरेशन अमानत 'अंतर्गत चोरीला गेलेले किंवा चुकीने राहून गेलेले प्रवाशांचे सामान त्यांना परत मिळवून देण्याची कामगिरी आरपीएफ करते. ६ फेब्रुवारीला ०७८२९ गोंदिया-गढा पॅसेंजरमध्ये एका महिलेची बॅग राहून गेली. रेल्वे सुरक्षा दलाच्या बालाघाट चाैकीतील जवानांनी ज्या महिलेची ही बॅग होती, त्यांचा पत्ता शोधून त्यांना ती परत केली. बॅगमध्ये ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य होते.
अशाच प्रकारे राजनांदगाव (छत्तीसगड) मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेची ट्रॉली बॅग घाईगडीत राहून गेली. त्या महिलेचा शोध घेऊन आरपीएफने ती बॅग परत केली. याबॅगमध्ये १ लाख, ६० हजारांची रोकड आणि अन्य सामान असे सुमारे पावणदोन लाखांचे साहित्य होते. घरच्यांना माहिती झाले तर काय होणार, अशी चिंता लागलेल्या या महिलांना अवघ्या काही तासातच रोख आणि दागिने परत मिळाल्याने त्या महिलांनी आरपीएफ जवानांचे तोंडभरून काैतुक केले. अशा प्रकारे १ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२४ या दीड महिन्याच्या कालावधीत आरपीएफनेलहान मोठ्या २५ प्रकरणातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांचे ११ लाख, ४६ हजार, ८९९ रुपये किंमतीचे साहित्य परत केले. गेल्या वर्षी अशाच प्रकारे १६७ प्रकरणात प्रवाशांचे ४४ लाख, ९४ हजार, २०५ रुपये किंमतीच्या चिजवस्तू परत मिळवून दिल्या होत्या, असेही आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी सांगितले.
घाईगडबड करू नका
या संबंधाने आर्य यांनी रेल्वेत प्रवास करताना कोणत्याही प्रकारची घाईगडबड करू नये, धावत्या गाडीत चढू अथवा उतरू नये. कुठे काही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ आरपीएफशी संपर्क करावा, असे आवाहनही आर्य यांनी रेल्वे प्रवाशांना केले आहे.