आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'; पळून जाणाऱ्या १३९९ मुला-मुलींना आईवडिलांना सोपविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 07:19 PM2023-02-27T19:19:09+5:302023-02-27T19:19:42+5:30

Nagpur News रेल्वेच्या संपत्तीची आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या वर्षभरात भरकटलेल्या, पळून जाणाऱ्या १३९९ मुलामुलींना त्यांच्या पालकांना सोपविले आहे.

RPF's 'Operation Nanhe Ferishte'; 1399 runaway boys and girls were handed over to their parents | आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'; पळून जाणाऱ्या १३९९ मुला-मुलींना आईवडिलांना सोपविले 

आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'; पळून जाणाऱ्या १३९९ मुला-मुलींना आईवडिलांना सोपविले 

googlenewsNext

नागपूर : रेल्वेच्या संपत्तीची आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या वर्षभरात भरकटलेल्या, पळून जाणाऱ्या १३९९ मुलामुलींना त्यांच्या पालकांना सोपविले आहे. आरपीएफने या कामगिरीचा आढावा नुकताच पत्रकारांना दिला आहे.

रेल्वेच्या संपत्तीची तसेच प्रवाशांची आणि त्यांच्या साहित्याची सुरक्षा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आरपीएफच्या खांद्यावर असते. त्यासाठी रेल्वेस्थानकाच्या आतबाहेर आणि धावत्या रेल्वेत आरपीएफचे जवान सतर्कतेने जबाबदारी वाहताना दिसतात. हे करताना कुणी संशयित व्यक्ती, वस्तू दिसल्यास ताब्यात घेऊन चाैकशीनंतर त्या संबंधाने योग्य ती कारवाई केली जाते. आरपीएफ दरवर्षी अमली पदार्थ प्रतिबंधक तसेच अन्य काही मोहीम राबवित असते. अशाच पैकी घरून पळून जाणाऱ्या किंवा कुणी फूस लावून नेणाऱ्या मुलामुलींना पकडण्यासाठी आरपीएफतर्फे दरवर्षी ऑपरेशन नन्हे फरिश्ते राबविले जाते. आरपीएफच्या जवानांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत आरपीएफने हे ऑपरेशन राबविले. त्यात ९४९ मुले आणि ४५० मुली अशा एकूण १३९९ मुलामुलींना पकडण्यात आले.

भविष्य अंधकारमय होण्यापासून वाचले

विशेष म्हणजे, आरपीएफच्या हाती लागलेल्या मुला-मुलींपैकी काही जण रागाच्या भरात घरून पळून आले होते. कुणाला फूस लावून पळविले जात होते तर कुणी चमकदमक पाहून भरकटल्यासारखे कुठे तरी निघून जाण्याच्या तयारीने रेल्वेत बसले होते. चुकून ते असामाजिक तत्त्वांच्या हाती लागले असते तर त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले असते. आरपीएफच्या जवानांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले. यात चाइल्डलाइन तसेच रेल्वे पोलिस आणि रेल्वेच्या अन्य कर्मचाऱ्यांचीही मदत झाल्याचे आरपीएफने म्हटले आहे.

पकडण्यात आलेल्या मुलांची विभागवार माहिती

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक ४४१ मुले आणि १७४ मुलामुलींना वाचविण्यात आले. भुसावळ विभाग १५० मुले, १३४ मुली, पुणे विभागात २३३ मुले आणि ५२ मुली, सोलापूर विभागात ३६ मुले आणि २२ मुली तर नागपूर विभागात ८९ मुले आणि ६८ मुले आरपीएफच्या हाती लागली.

------

Web Title: RPF's 'Operation Nanhe Ferishte'; 1399 runaway boys and girls were handed over to their parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस