रिपाइं एकीकरण फसलेला प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:46 AM2018-08-07T00:46:05+5:302018-08-07T00:47:10+5:30
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत रिपाइं मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक रमेश जीवने यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत रिपाइं मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक रमेश जीवने यांनी व्यक्त केले.
रिपाइं मुक्ती आंदोलन या अभियानांतर्गत सोमवारी आमदार निवास येथे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या विविध कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात उपरोक्त विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यानंतर लोकमतशी बोलताना जीवने यांनी सांगितले की, एकीकरण हा फसलेला प्रयोग आहे. तेव्हा आता एकच पक्ष हाच महत्त्वाचा आहे. त्यादिशेने आम्ही काम करीत आहोत. विविध गटांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जात आहे. या अंतर्गतच आजची बैठकही बोलावण्यात आली होती. त्यात केवळ प्रतिनिधिक स्वरुपात पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रित करण्यात आले होते.
रंजना वासे यांच्या अध्यक्षतेखली बैठक पार पडली. यावेळी निमंत्रक अशोक मेश्राम, अमित भालेराव, प्रशिक आनंद, सीमा अलोने, क्षितिज गायकवाड, श्रीकांत ओगले, राहुल जारोंडे, जयबुद्ध लोहकरे, राजदीप नगरारे आदी उपस्थित होते.
गवई यांच्या पक्षात सर्व गट विसर्जित व्हावे
सध्या नेमका कोणता रिपब्लिकन पक्ष खरा आहे, अशी विचारणा केली असता रमेश जीवने यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुºया पत्रावर आधारित ज्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे पहिले अध्यक्ष एन. शिवराज, दुसरे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, तिसरे अध्यक्ष रा.सू. गवई आणि सध्या कर्नाटकचे माजी आमदार एन. राजेंद्रन हे अध्यक्ष आहेत. तर डॉ. राजेंद्र गवई हे सरचिटणीस आहेत. हा पक्षच खरा असून या पक्षातच सर्व गट विसर्जित व्हावे. परंतु या पक्षाचे नेतृत्व करणाºयांनीही पक्षाला बंदिस्त करून ठेवता कामा नये. ते समाजासाठी खुले करावे, असे आवाहनही त्यांनी केले.