नाग नदीसाठी १२९८ कोटी
By admin | Published: June 15, 2016 03:03 AM2016-06-15T03:03:50+5:302016-06-15T03:03:50+5:30
नागपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नागनदीला गत वैभव प्राप्त व्हावे. यासाठी महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठविलेल्या १२९८ कोटी रुपयांच्या ‘नागनदी पुनरुज्जीवन’....
नागपूर : नागपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या नागनदीला गत वैभव प्राप्त व्हावे. यासाठी महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठविलेल्या १२९८ कोटी रुपयांच्या ‘नागनदी पुनरुज्जीवन’ योजनेला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंगळवारी मंजुरी दिली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्र्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यात नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुणे शहरातील मुठा नदीच्या धर्तीवर या योजनेचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकार करणार असून १५ टक्के खर्च महापालिकेला करावयाचा आहे. कोणत्याही शहराचे पर्यावरण नद्याच्या आरोग्यावरून जोखले जाते. परंतु नागनदीत सिवरेज व सांडपाणी सोडण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. यामुळे शहराच्या पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.
गतकाळात नाग नदीच्या पाण्याचा वापर केला जात होता. परंतु वाढत्या लोकसंख्येसाबतच नदीपात्रात सिवरेज व सांडपाणी सोडले जात असल्याने या नदीला बकाल स्वरूप आले आहे. नदीची शहरातील लांबी १७ किलोमीटर आहे.
प्रवाह शुद्ध करण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर सिवरेज लाईन टाकून त्यावर ठिकठिकाणी छोटे-छोटे मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याचे या योजनेत प्रस्तावित आहे. तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते नदीपात्रात सोडले जाणार आहे. नदीला संरक्षक भिंत, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते, हिरवळ व वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे अशा ठिकाणी उद्यान निर्माण केले जाणार आहे.
‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश
उपराजधानीचे वैभव असलेल्या नागनदीचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी लोकमतने गत तीन वर्षापासून ‘नागनदी स्वच्छता अभियाना’च्या माध्यमातून नागनदीच्या दुरावस्थेसंदर्भात महापालिका प्रशासन, राज्य आणि केंद्र सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. महापालिकेच्या स्वच्छता अभियानात नागरिक ांच्या जनजागृती संदर्र्भात लोकमतने नेहमीच पुढाकार घेतला. या पाठपुराव्याला यश आले आहे.
नागनदी ही महाराष्ट्राच्या उपराजधानीचे वैभव आहे. ती या शहराच्या इतिहासाची आणि लोकसंस्कृतीची साक्षीदार आहे. अशा या नागपूर शहराचे वैभव असलेल्या नागनदीचे पुनरुज्जीवन व्हावे. ती स्वच्छ व्हावी, असे स्वप्न मी लहानपणापासून बाळगले होते. सार्वजनिक जीवनात वावरताना आपण काही करू शकत नसल्याची खंत मनाला बोचत होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संकल्प केला. केंद्रात तसेच महाराष्ट्रात पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर संकल्प अधिक प्रबळ झाला. पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीमुळे आता नागनदीच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला. हे साऱ्या नागपूरकरांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने पहिले पाऊ ल यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. याचे फार मोठे समाधान मला आहे. या सर्व प्रयत्नात नागपूरकरांचे सहकार्य तेवढेच लाख मोलाचे राहील.
नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री