नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १५०७ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:31 AM2018-04-05T00:31:52+5:302018-04-05T00:32:02+5:30
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी अर्थात दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी एकूण २८२९ कोटी रुपये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी अर्थात दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी एकूण २८२९ कोटी रुपये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.
याआधी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ३१० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मागील आर्थिक वर्षात नागपूर मेट्रो प्रकल्पाकरिता २६० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता ११० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते . मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारने दोन्ही प्रकल्पांना ७० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १५०७ कोटी रुपयांपैकी २७९ कोटी रुपये इक्विटीअंतर्गत, १८५ कोटी रुपये सर्बोर्डिनेटेड डेट (एसडी) केंद्र सरकारतर्फे लावलेल्या कर्जाच्या निमित्त्याने आणि उरलेले १०४३ कोटी रुपये केएफडब्ल्यू आणि एएफडीतर्फे कर्जस्वरूपात प्राप्त होतील. २०१७-१८ या आर्थिक वर्षात सादर झालेल्या अर्थसंकल्पात नागपूर आणि पुणे अशा दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १३५० आणि ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर यंदाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात नागपूर आणि पुणे अशा दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १५७ कोटी आणि ८२२ कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली आहे.
सीएमआरएस ९ रोजी परीक्षण करणार
नागपूर मेट्रोच्या शेवटच्या परीक्षणासाठी येणाऱ्या ‘सीएमआरएस’च्या वेळापत्रकात बदल झाला असून आता चमू सोमवार ९ एप्रिलला नागपुरात येत आहे. संपूर्ण दिवस मेट्रो संबंधित सर्व घटकांचे परीक्षण करून अहवाल सादर करेल. हा दौरा ६ व ७ एप्रिलला नियोजित होता.