१७४ रुपयांसाठी कापली वीज, ग्राहकाला मिळाली ५० हजाराची नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 09:22 PM2018-07-27T21:22:11+5:302018-07-27T21:25:57+5:30
मोठ्या थकबाकीदारांना सोडून अवघ्या १७४ रुपयांच्या थकीत बिलासाठी एका महिलेचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित करणाऱ्या एसएनडीएलला ग्राहक कल्याण मंचने फटकारले. इतकेच नव्हे तर पीडित महिला ग्राहकाला झालेला त्रास लक्षात घेता एसएनडीेलला ५० हजार रुपयाची नुकसानभरपाई सुद्धा द्यावी लागली. परंतु यासाठी पीडित महिलेला बराच संघर्षही करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोठ्या थकबाकीदारांना सोडून अवघ्या १७४ रुपयांच्या थकीत बिलासाठी एका महिलेचे वीज कनेक्शन बेकायदेशीरपणे खंडित करणाऱ्या एसएनडीएलला ग्राहक कल्याण मंचने फटकारले. इतकेच नव्हे तर पीडित महिला ग्राहकाला झालेला त्रास लक्षात घेता एसएनडीेलला ५० हजार रुपयाची नुकसानभरपाई सुद्धा द्यावी लागली. परंतु यासाठी पीडित महिलेला बराच संघर्षही करावा लागला.
संगीता गोपीचंद चंद्रिकापुरे असे या महिलेचे नाव आहे. त्या प्लॉट नं. ९२ के.जी.एन सोसायटी सुवर्णनगर पोस्ट उप्पलवाडी येथे राहतात. ४१००१७६१०५७४ हा त्यांचा वीज ग्राहक क्रमांक आहे. हा क्रमांक संगीता यांच्या नावावरच आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांच्या नावावर १७० रुपयाचे थकीत वीज बिल होते. दरम्यानच्या काळात संगीता या चंद्रपूरला असल्याने त्या बिल भरू शकल्या नाही. थकीत वीज बिल भरण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१७ ही होती. परंतु एसएनडीलच्या अधिकाºयांनी त्यापूर्वीच २७ फेब्रुवारी रोजी कुठलीही पूर्वसूचना न देता चंद्रिकापुरे यांच्या घराचे वीज कनेक्शन विद्युत खांबावरूनच कट केले. तसेच दुसºया एका व्यक्तीच्या नावाने नवीन कनेक्शनही देऊन टाकले. चंद्रिकापुरे यांना याबाबत माहीत होताच त्यांनी विद्युत ग्राहक कल्याण निवारण मंचकडे तक्रार केली. तसेच नुकसानभरपाईची मागणी केली. मंचने त्यांचे म्हणणे मान्य केले. वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ग्राहकाला पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत १५ दिवसात वीज कनेक्शन पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. एसएनडीएल्या अधिकाºयांनी यात बदमाशी केली. त्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम एसएनडीएलने वीज बिलाच्या क्रेडिटमध्ये दर्शविली. चंद्रिकापुरे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी पाठपुरावा कायम ठेवला. त्यांनी याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत लोकपालाकडे तक्रार करीत आपल्याला झालेला आर्थिक, मानसिक त्रास लक्षात घेता नुकसान भरपाईची रक्कम थेट आपल्याला मिळावी, अशी मागणी केली. विद्युत लोकपालाने त्यांची मागणी मान्य करीत एसएनडीएलला तसे निर्देश दिले. या आदेशानुसार एसएनडीएलने गेल्या १८ जुलै रोजी ५० हजार रुपये नुकसानभरपाईचा धनादेश संगीता चंद्रिकापुरे यांना दिला. अशा प्रकारे १७४ रुपयाच्या थकबाकीसाठी केलेली कारवाई एसएनडीएलला ५० हजार रुपयाला पडली.