अबब... महिनाभरात फुकट्या प्रवाशांकडून २०.४९ कोटी रुपये वसूल
By नरेश डोंगरे | Published: January 4, 2024 05:12 PM2024-01-04T17:12:55+5:302024-01-04T17:13:19+5:30
फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने अवघ्या एका महिन्यात चक्क २० कोटी, ४९ लाखांचा दंड वसूल केला आहे.
नागपूर : रेल्वे आपलीच मालमत्ता आहे, अशा अविर्भावात कोणतेही तिकिट न काढता रेल्वेतून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशा फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून रेल्वे प्रशासनाने अवघ्या एका महिन्यात चक्क २० कोटी, ४९ लाखांचा दंड वसूल केला आहे.
विना तिकिट प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे, असे वारंवार तोंडी, लेखी सांगूनही फुकटे प्रवासी जुमानत नाहीत. 'रेल्वे आपलीच संपत्ती आहे, तिचे संरक्षण आणि देखभाल करा' असे रेल्वे गाड्यांच्या कोचमध्ये लिहून असते. त्यामुळे की काय, फुकट प्रवास करण्याची सवय जडलेले प्रवासी तिकिट न काढताच रेल्वेत बसतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बिनधास्त प्रवास करतात.
वारंवार कारवाई करूनही ते जुमानत नसल्याचे पाहून फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी मध्य रेल्वेने डिसेंबर २०२३ मध्ये पाचही विभागात विशेष तिकिट तपासणी मोहिम राबविली. त्यात हजारोंच्या संख्येत फुकटे प्रवासी रेल्वेतून प्रवास करताना हाती लागले. त्यांच्याकडून एकूण २० कोटी, ४९ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. नागपूर विभागातून २ कोटी, ९४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अन्य प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी वैध रेल्वे तिकिट काढून प्रवास करण्याचे आवाहन, मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.
विभागनिहाय दंड वसुली
मुंबई विभाग : ७.३३ कोटी
भुसावळ विभाग : ४.५४ कोटी
नागपूर विभाग : २.९४ कोटी
सोलापूर विभाग : २.५८ कोटी
पुणे विभाग : १.५६ कोटी
मुख्यालय रु. १.५२ कोटी