आई कोमात गेल्याने मुलाचा हॉस्पिटलविरुद्ध ३.५ कोटींचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:24 AM2018-06-20T11:24:04+5:302018-06-20T11:24:17+5:30
कमाल चौक येथील मदन हॉस्पिटल व कामठी रोडवरील व्हिनस हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये ३.५ कोटी रुपये भरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कमाल चौक येथील मदन हॉस्पिटल व कामठी रोडवरील व्हिनस हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये ३.५ कोटी रुपये भरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील अॅड. शैलेश नारनवरे यांनी हा दावा दाखल केला आहे.
डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे आई जिजाबाई कोमामध्ये गेली असा आरोप नारनवरे यांनी केला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोन्ही रुग्णालयांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात यावी असेही नारनवरे यांचे म्हणणे आहे. आयोगाने १८ जून रोजी प्रकरण ऐकले व नारनवरे यांना आणखी काही कागदपत्रे सादर करण्यासाठी २८ जूनपर्यंत वेळ दिला.
आजारी जिजाबाई यांना उपचारासाठी ४ एप्रिल रोजी मदन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुपारी २ वाजता डॉ. राजेश बघे यांच्या निरीक्षणाखाली डॉ. अमिदा अहमद यांनी उपचार सुरू केले. जिजाबाई यांना ब्लड शुगर नसताना इन्सुलिन देण्यात आले. त्यामुळे जिजाबार्इंना ब्रेन स्ट्रोक आला. त्याची माहिती नातेवाईकांना वेळेवर देण्यात आली नाही. त्यामुळे ‘गोल्डन अवर’ मानल्या जाणाऱ्या सहा तासांमध्ये जिजाबाई यांना मोठ्या रुग्णालयात नेऊन उपचार करता आले नाही. दरम्यान, डॉ. बघे यांनी जिजाबार्इंना स्वत:च्याच व्हिनस हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित केले. त्या ठिकाणीही विशेष उपचाराच्या सुविधा नव्हत्या असे नारनवरे यांचे म्हणणे आहे.